प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलं मनसेचं भविष्य; भोंग्याचा झाला फायदा, महापालिकेत मिळेल यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:09 AM2022-05-12T11:09:49+5:302022-05-12T11:10:51+5:30
राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपाला धक्का लागला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी सायन येथे सभा का घेतली? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
मुंबई – राज्यात गुढी पाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सगळीकडे चर्चेचा विषय बनले आहेत. राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानं सत्ताधारी शिवसेनेची अडचण वाढली आहे. त्यात राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केला असून येत्या ५ जूनला ते अयोध्येत जाणार आहेत. परंतु त्याठिकाणी भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज यांना कडाडून विरोध केला आहे. माफी मागत नाही तोवर अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
राज ठाकरेंनी(Raj Thackeray) हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर त्यांना भाजपाची बी टीम म्हणून हिणवण्यात आले. परंतु वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मनसेच्या राजकीय भविष्याबाबत अंदाज वर्तवले आहेत. भोंग्याचा राजकीय फायदा राज ठाकरेंना होईल असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. भोंगे वादात जर कुणाचा फायदा झाला असेल तर तो राज ठाकरेंचा झाला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेचा शिवसेनेसह भाजपालाही धक्का लागल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपाला धक्का लागला नसता तर देवेंद्र फडणवीस यांनी सायन येथे सभा का घेतली? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंनी पुढील राजकीय पावलं योग्य टाकली तर सगळ्या महापालिकांमध्ये मनसेचे ४-५ नगरसेवक दिसतील असंही त्यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदीवरील भोंगे खाली उतरलेच तसेच मंदिरावरील भोंगेही उतरवण्यात आले.
राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा नारा अन् अयोध्या दौरा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा विषय काढत राज्य सरकारला इशारा दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचं पालन करत भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत असं राज म्हणाले. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या २८ हजार कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस आणि तडीपारी कारवाई करण्यात आली. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना घ्यावी लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी आवाज कमी झाल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी जड जाण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये भागीदारी असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाबाबत आणि मशिदीवरील अनधिकृत भोंग्याबाबत ठोस भूमिका घेणं कठीण झालं आहे. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंना भोंगा मुद्द्याचा किती फायदा होतो हे निवडणुकीतून स्पष्ट होईल.