आठवलेंना उमेदवारी नाकारली तर रिपाइं बंड करणार, अपक्ष उमेदवार देणार; भाजपाला इशारा
By शिवाजी पवार | Published: March 15, 2024 02:11 PM2024-03-15T14:11:46+5:302024-03-15T14:12:02+5:30
शिर्डी व नगर दक्षिणेतून अपक्ष उमेदवार देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : भारतीय जनता पक्षाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांना उमेदवारी नाकारली तर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात अपक्ष उमेदवार देण्याचा इशारा रिपाइंने दिला आहे. निवडणुकीत कार्यकर्ते भाजपच्या विरुद्ध काम करतील. त्यामुळे शिर्डी व सोलापूर या दोन जागा पक्षाला द्याव्या अशी मागणी रिपाइंने केली आहे.
येथील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी सायंकाळी उशिरा आयोजित पत्रकार रिपाइंचे नेते विजय वाकचौरे, राजाभाऊ कापसे, दीपक गायकवाड यांनी ही माहिती दिली. यावेळी भीमराज बागुल, आशिष शेळके, सुभाष त्रिभुवन, आबासाहेब रणवरे, सुनील शिरसाठ, रमादेवी धीवर, राजू नाना गायकवाड आदी उपस्थित होते.
वाकचौरे म्हणाले, रिपाइं हा भाजपचा जुना मित्र पक्ष आहे. नव्याने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातात. मात्र रिपाइंने कठीण काळात भाजपची साथ देऊही डावलले जात आहे. लोकसभेसाठी शिर्डी व सोलापूर या दोन जागा देण्यात याव्यात. या दोन जागांच्या बदल्यात महायुतीला सर्व जागांवर विजयी करण्याची ताकद रिपाइंमध्ये आहे. शिर्डीतून आठवले यांना उमेदवारी मिळाल्यास भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अन्य नेते त्यांना विजयी करू शकतात, असे वाकचौरे यांनी सांगितले.