रस्ता दुरुस्त न झाल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By admin | Published: June 8, 2016 02:44 AM2016-06-08T02:44:40+5:302016-06-08T02:44:40+5:30
खानिवडे शाळेचा निकाल १०० टक्के लागला असला तरी उसगाव ते भाताणे भालीवली ते भिनार हे या भागातील मार्ग खराब झाले आहेत
वसई : वसई ग्रामीण भागात दहावीच्या शालांत परिक्षेत चांदीप, खानिवडे शाळेचा निकाल १०० टक्के लागला असला तरी उसगाव ते भाताणे भालीवली ते भिनार हे या भागातील मार्ग खराब झाले आहेत. त्यामुळे नवसई, भाताणे, आडणे, हत्तीपाडा, आंबुलपाडा येथील आदिवासी विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.
उसगाव ते भाताणे हा मार्ग काही वर्षापासून तानसा नदीकाठाच्या बाजूने खचला आहे. या मार्गावरून सुरू असलेली एसटी सेवा ८ वर्षापासून बंद आहे जीव धोक्यात घालून फक्त रिक्षा चालक या मार्गावर प्रवासी वाहतूक करतात. या वर्षी खचलेला हा मार्ग सार्वजनिक बांधकामे विभागाने दुरूस्त केला नाही तर या मार्गावरील होणारी वाहतुकच ठप्प होणार आहे.
त्याचप्रमाणे भालवली ते निंबवली हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार होत असून भातणे ते भालीवली या गावादरम्यानच्या मार्गावर फक्त मातीच टाकली आहे. पाउस पडल्यास चिखल होऊन प्रवास करणे धोक्याचे होईल. त्यामुळे प्रशासनाने जागे होऊन शाळा सुरू होण्याआधी हे मार्ग प्रवाशांच्या दृष्टीने सुखकर करावेत, अशी मागणी आहे.