सेनेची साई पक्षाला महापौरपदाची आॅफर
By Admin | Published: March 15, 2017 02:32 AM2017-03-15T02:32:38+5:302017-03-15T02:32:38+5:30
भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या साई पक्षाला महापौरपद किंवा अन्य महत्वाची पदे मिळत नसल्याने त्या पक्षाची होणारी घालमेल ओळखून शिवसेनेने त्या पक्षाला
उल्हासनगर : भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या साई पक्षाला महापौरपद किंवा अन्य महत्वाची पदे मिळत नसल्याने त्या पक्षाची होणारी घालमेल ओळखून शिवसेनेने त्या पक्षाला महापौरपदाची आॅफर देत भाजपाची कोंडी केली आहे. साई पक्षाने पाठिंबा देऊनही महापौर भाजपाचाच असेल, असे त्या पक्षाने सांगितले आहे आणि तेच पद हवे असल्याचे ओळखून शिवसेनेने त्याची आॅफर दिल्याने साई पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
पालिकेत सत्तेसाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपाचे ३३ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे रिपाइं व पीआरपीच्या तीन तीन नगरसेवकांसह २८ नगरसेवक आहेत. साई पक्षाचे ११ नगरसेवक आहेत. ते भाजपासोबत गेले तर भाजपाची सदस्यसंख्या ४४ होत आणि शिवसेनेसोबत गेले तर ३९ होते. त्यामुळे साई पक्षाचे महत्व कमी करण्याची भाषा करत भाजपा आणि शिवसेनेनेच त्या पक्षाचे महत्व वाढवल्याने साई पक्षावरून युतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.
काँग्रेसच्या एका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनीही साई पक्षाला पाठिंबा द्यावा, असे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवजयंतीनंतर या महायुतीची घोषणा करण्यात येईल, असे संकेत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी दिले आहेत. त्याचवेळी महापौर निवडीला २० दिवस वेळ असल्याचे सूचक वक्तव्य साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी केल्याने मोठया प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपाचे मास्टरमाइंड प्रकाश मखिजा, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामणी आदींनी बिनशर्त पाठिंब्यासाठी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांचे मन वळवले होते. विकासाच्या मुद्दयावर इदनानी यांनी एका आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्र्याची भेटही घेतली होती. पण पद मिळत नसल्याची त्यांची अस्वस्थता लपत नव्हती.
मध्यंतरी भाजपा-शिवसेना एकत्र येतील. मुंबई-ठाण्यात ज्याप्रमाणे भाजपाने बिनशर्त पाठिंबा दिला, तसा शिवसेनेने उल्हासनगरात द्यावा, असे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली होती. त्यातून साई पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, असेही संकेत दिले जात होते. मात्र शिवसेनेने महापौरपदाचा आपला दावा अचानक सोडून साई पक्षाला पाठिंबा देण्याची केळी खेळल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. हाताशी आलेली सत्ता टिकवायची असेल तर त्यांना शिवसेनेसोबत वाटाघाटी करण्यावाचून सत्तेतील वाटा देण्यावाचून पर्याय उरलेला नाही, हेच या खेळीतून स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)