शरद पवार ठाम राहिल्यास राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी ठरू शकते नवे सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:16 AM2023-05-04T06:16:13+5:302023-05-04T09:26:58+5:30

प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे यांचीही नावे पक्षाध्यक्षपदासाठी पहिल्या दिवशी चर्चेत होती.

If Sharad Pawar remains firm, it can be a new formula for the post of NCP president | शरद पवार ठाम राहिल्यास राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी ठरू शकते नवे सूत्र

शरद पवार ठाम राहिल्यास राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी ठरू शकते नवे सूत्र

googlenewsNext

मुंबई - शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत कमालीची उत्सुकता असून सध्यातरी खा. सुप्रिया सुळे यांचेच नाव आघाडीवर आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या तर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अजित पवारांकडे येतील, असे चित्र असून पक्षातील काही नेतेमंडळींनी त्याला दुजोरा दिला आहे.  कन्या या नात्याने सुप्रिया सुळे यांनीच पक्षाची धुरा हातात घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करावे, असे मानणारा एक मोठा वर्ग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून ते त्यासाठी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे यांचीही नावे पक्षाध्यक्षपदासाठी पहिल्या दिवशी चर्चेत होती. मात्र, पटेल आणि तटकरे यांचे नेतृत्व सगळ्यांना मान्य होणार नाही. तसेच आपल्याला अध्यक्ष होण्यात रस नसल्याचे पटेल यांनीही स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे आले तर त्यावर पक्षात सहमती  होऊ शकेल, असे राष्ट्रवादीतील एका नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

वातावरण तापल्याने ‘वज्रमूठ’ सभा रद्द
शरद पवार यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत उलटसुलट चर्चांना ऊत आला आहे. अशात महाविकास आघाडीची पुण्यात होणारी वज्रमूठ सभा रद्द करण्यात आली आहे. या सभेच्या आयोजनाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्यामुळे आघाडीची वज्रमूठ कायम राहणार की सैल होणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

जयंत पाटलांची नाराजी, आव्हाडांचा राजीनामा
राष्ट्रवादीमध्ये दुसऱ्या दिवशीही वेगवान घडामोडी घडल्या असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे चर्चेत होते. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे आता अजित पवार यांच्याकडे जाणार असल्याने जयंत पाटील सर्वाधिक अस्वस्थ आहेत. त्यांनी सायंकाळी ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन पवार यांची भेट घेतली; परंतु, तरीही त्यांची अस्वस्थता कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

राजीनामा कुणी देऊ नये 
कुणीही राजीनामा देऊ नये, साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी धीर धरावा व राजीनामा सत्र थांबवावे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

अध्यक्ष निवडीसाठी नियुक्त केलेली समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले आणि आंदोलन थांबवण्याच्या सूचना केल्या. हा निर्णय सांगून घेतला असता तर तुम्ही मला थांबवले असते, असे पवारांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. आम्ही ५ मेपर्यंत थांबतो, नाहीतर आम्ही राजीनामे देऊ, असे या कार्यकर्त्यांनी पवारांना सांगितले. त्यावर शरद पवार म्हणाले की, ५ मेपर्यंत थांबावे, समितीचा तोपर्यंत निर्णय होईल, तो मान्य करूया.

आपल्या निर्णयावर शरद पवार ठाम आहेत. महाराष्ट्रातील पक्षाचा कारभार अजित पवार बघतात, तर दिल्लीतील पक्षाचे काम, संसदेतील काम सुप्रिया सुळे योग्यप्रकारे सांभाळतात. अनेक वेळा संसदरत्न पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे त्या पक्षाध्यक्ष व्हायला अडचण नाही - छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मला अध्यक्ष होण्यात अजिबात रस नाही. माझ्याकडे आधीच खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे - प्रफुल्ल पटेल, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: If Sharad Pawar remains firm, it can be a new formula for the post of NCP president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.