शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत वार झाला नसता - उद्धव ठाकरे
By admin | Published: July 1, 2016 08:49 AM2016-07-01T08:49:27+5:302016-07-01T09:37:09+5:30
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही असे सांगत उद्धव ठाकरेंनी एकनाथ खडसेंना सहानुभूती दर्शवली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - : माझ्याविरोधात ठरवून कारस्थान केले गेले. पण मी तोंड उघडले तर देश हादरला असता, असे खळबळजनक विधान करणारे भाजपाचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पाठराखण केली आहे.एरवी एकनाथ खडसेंवर तुटून पडणा-या शिवसेनेने आजच्या अग्रलेखातून खडसेंना सहानुभूती दाखवत भाजप नेत्यांना टोले लगावले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही भाजपावर टीकास्त्र सोडत 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही' असे सांगत खडसेंना सहानुभूती दर्शवली आहे. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखातून उद्धव यांनी भाजपावर टीका केली आहे.
आणखी वाचा :
'युती आपणच तोडल्याची शेखी खडसे एखाद्या शौर्यचक्राप्रमाणे मिरवीत होते. शिवसेनेशी युती तोडली म्हणून भाजपचा मुख्यमंत्री झाला, पण माझ्या वाट्याला हे काय आले? असा प्रश्न खडसे यांनी केला. खडसे यांची वेदना समजून घेतली पाहिजे, त्यांनीच शिवसेनेशी युती तोडण्यात पुढचे पाऊल टाकले. कारण त्यावेळी देशात मोदी यांची लाट होती व त्या लाटेत ओंडके व काटक्याही तरंगल्या. आम्हाला त्याची खंत नाही. पण युती तोडली नसती तर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता, असे खडसे म्हणतात. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर खडसेंच्या पाठीत हे असे वार कदाचित झाले नसते. कारण पाठीत वार करण्याची अवलाद शिवसेनेची नाही' असे उद्धव यांनी म्हटले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर आभाळ कोसळले असते काय? याचे चिंतन करण्यास खडसे आता मोकळे आहेत, असेही उद्धव यांनी नमूद केले आहे. तसेच खडसे यांच्यावर लागलेला ‘दाऊद’ संबंधाचा आरोप मान्य होण्यासारखा नाही. दाऊदशी संबंध जोडून खडसे यांच्या देशभक्तीवरच कलंक लावण्याचा प्रकार हा त्यांच्यावर अन्याय ठरतो व याबाबतीत त्यांचे ऐकून घेतले नाही हा त्याहून मोठा अन्याय ठरू शकतो, अशी सहानुभूती त्यांनी व्यक्त केली. तसेच खडसे यांच्याशी राजकीय लढायला आम्ही समर्थ आहोत. पण एखाद्या विषयात नाहक बदनामी घडवून राजकीय पोळ्या भाजणारे आम्ही नव्हे, हे सत्य सांगण्याची हिंमत आमच्यात आहे व त्याबद्दल खडसे यांच्या पक्षातील कुणाचा आक्षेप असेल तर त्यांना बोंबलण्याचा आणि ‘सामना’ जाळण्याच्या धमक्या देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असा चिमटाही उद्धव यांनी भाजपा नेत्यांना काढला आहे.