शिवसेनेने पाठिंबा काढल्यास सरकार अल्पमतात येईल
By admin | Published: February 9, 2017 11:27 PM2017-02-09T23:27:23+5:302017-02-09T23:27:46+5:30
महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल.
ऑनलाइन लोकमत
बारामती/काटेवाडी, दि. 9 - महापालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात येईल. शिवसेनेनेसह विरोधकांचे संख्याबळ त्या वेळी १५० असेल. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकापसह अन्य डाव्या पक्षांचा समावेश आहे. सध्या सरकार जाईल की राहील, अशी अवस्था असल्याचे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाचे १३८ आमदार राहतील. त्यावर सरकार टिकणार कसे, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर पवार यांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभाच्या सभेत वरील भाकीत केले. त्यांनी भाजपावर सडकून टीका केली. भाजपाच्या डोक्यात सत्ता भिनली आहे. त्यांचे मित्रपक्षदेखील नाराज आहेत. शिवसेनेचे मंत्रीदेखील आम्हाला कोणी विचारत नाही, असे सांगतात. राज्यमंत्र्यांना तर अधिकारच ठेवले नाही. निर्णय घेताना भाजपा विचारात घेत नाही, अशी खंत आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर सरकार अल्पमतात येईल. तेव्हा अन्य कोणतेही पक्ष त्यांना पाठिंबा देणार नाहीत, असे सांगून ते मोकळे झाले.
भाजपा-शिवसेनेचे सरकार शेतकरीविरोधी आहे. यांना शेतक-यांचे काही देणेघेणे नाही. उत्तर प्रदेश निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकार आश्वासनांच्या घोषणा देत आहे. उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यास शून्य टक्के व्याजदराने कर्ज आणि कर्जमाफी देण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मग महाराष्ट्रात भाजपाचे सरकार असताना येथील शेतकऱ्यांची कर्जमाफी का करीत नाही, असा सवाल त्यांनी केला. सरकार फक्त घोषणा करीत आहे.
दलाल, गुंडांना पक्षात प्रवेश देत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना काही निर्णय घेता येत नाही. ज्यांना काही कळत नाही, त्यांना त्यांच्याकडे किंमत आहे. तेच निर्णय घेतात, हेच खरे राज्याचे दुर्दैव आहे, असा टोलाही त्यांनी मारला. बाळासाहेब शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सभापती करण खलाटे, गुलाबराव देवकाते आदींची भाषणे झाली. राजेंद्र पवार, संभाजी होळकर, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, योगेश जगताप, वनिता बनकर, गौरी काटे उपस्थित होत्या.