"कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून...", एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:45 PM2024-08-01T15:45:35+5:302024-08-01T15:46:42+5:30
Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. एकतर तू राहशील नाहीतर मी अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून फेसबूकवरुन सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. तसंच, राज्यात सुरू असलेल्या विकासामुळं विरोधक बिथरले असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात विकास काम सुरू झाली. महाविकास आघाडीची अडीच वर्षे आणि आमच्या महायुतीच्या सरकारची दोन वर्षे यांची तुलना करता लोकांना समजेल. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच पातळी सोडून टीका केली जाते.
एखाद्याला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतो. घरात बसून फेसबुकवरून सरकार चालवणाऱ्यांचं ते काम नाही. आम्ही फिल्डवर उतरतो आणि काम करतो. त्यामुळे लोकांची पसंती आम्हालाच आहे. येत्या काळात राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ऑलिम्पिकमध्ये पदक पटकवणाऱ्या स्वप्नील कुसळेचं अभिनंदन
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे यांने नेमबाजी प्रकारात कांस्य पदक मिळवलं. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसळे याचं अभिनंदन केलं. ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, "स्वप्निल कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी चांगली कामगीरी केल्याबद्दल त्याचं आणि त्याच्या पालकांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकार स्वप्निलला सर्वकाही सहकार्य करेल."