Tanushree Datta Controversy: याद राखा, तनुश्री दत्ताला प्रवेश दिला तर... मनसेची 'बिग बॉस'ला तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 19:41 IST2018-10-02T19:32:06+5:302018-10-02T19:41:35+5:30
अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून टाकण्याचा इशारा दिला.

Tanushree Datta Controversy: याद राखा, तनुश्री दत्ताला प्रवेश दिला तर... मनसेची 'बिग बॉस'ला तंबी
पुणे : अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर संतप्त झालेले मनसेचे कार्यकर्ते लोणावळ्यातील बिग बॉसच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी दत्ता यांना बिग बॉसमध्ये प्रवेश दिल्यास स्टेज उखडून टाकण्याचा इशारा दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खुर्ची हवी होती. ती त्यांना मिळाली नाही म्हणून ते गुंडगिरी करत आहेत, असे विधान केले होते. या विधानानंतर त्या चांगल्याच वादात सापडल्या असून त्यांच्यावर मनसैनिकांनी आक्षेप नोंदवला आहे. मंगळवारी याचाच भाग म्हणून लोणावळा येथील मनसे विद्यार्थी सेनेने बिग बॉस कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन दत्ता यांना प्रवेश दिला तर स्टेज उखडून टाकू असा इशारा दिला.दत्ता जर या कार्यक्रमात सहभाग होणार असतील तर त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कलर्स वाहिनीची असेल असे पत्रही बिग बॉस व्यवस्थापन देण्यात आले.
यावेळी मनविसे लोणावळा शहराध्यक्ष अक्षय जाचक, अविनाश जांभुळकर, विजय भानूसघरे, महिला आघाडी अध्यक्ष संगीता गुजर, संतोष शिंत्रे, सरपंच संतोष खराडे, सागर शेरकर, सुमित उके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.