शिंदेंच्या मंत्रिमंडळात डान्स करणाऱ्या आमदारांना सांस्कृतिक मंत्री केले तर..?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 06:27 AM2022-07-03T06:27:27+5:302022-07-03T06:27:55+5:30

बापू ज्यांच्यासाठी तुम्ही बंड केलं ते तुमचे नेते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही सगळे गोव्यात होतात... तुम्ही सगळ्यांनी तुमचा आनंद खतरनाक साजरा केला

if the MLAs who dance in Eknath Shinde cabinet are made cultural ministers ..? | शिंदेंच्या मंत्रिमंडळात डान्स करणाऱ्या आमदारांना सांस्कृतिक मंत्री केले तर..?

शिंदेंच्या मंत्रिमंडळात डान्स करणाऱ्या आमदारांना सांस्कृतिक मंत्री केले तर..?

googlenewsNext

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय शहाजीबापू पाटील
नमस्कार, 
बंडखोरी कोणी केली आणि प्रसिद्धी कोणाला मिळाली..? यावरून उभा महाराष्ट्र चर्चा करत आहे. गल्ली ते दिल्ली सगळेजण आपल्या त्या एका वाक्यावर डोलू लागले. काय ती झाडी... काय ते डोंगार... काय ते हाटील... एकदम ओके हाय... असं आपण म्हणालात खरे, पण उभ्या राज्यात त्या एका वाक्यावर लोक कविता करत आहेत, गाणी करत आहेत... एक मात्र आपण बेस्ट केलं. त्यामुळे लोक मूळ प्रश्न काय होता हे विसरूनच गेले की राव... तुम्ही सगळे सुरत मार्गे गुवाहाटीला कशासाठी गेलात...? तिथे जाऊन काय केले..? हॉटेलचा, विमानाचा खर्च कोणी केला..? हे सगळे प्रश्न तुमच्या एका वाक्याने खाऊन टाकले... तिथून तुम्ही गोव्याला का गेलात...? दोन-तीन दिवस का थांबलात..? कशाची कशाला टोटल लागत नाही, पण बापू, तुम्ही गोव्यात गेल्यावर काय तो समुद्र... काय ते मासे... काय ते कापडं घालून फिरणारी माणसं... असली कविता का केली नाही..?

पण बापू ज्यांच्यासाठी तुम्ही बंड केलं ते तुमचे नेते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही सगळे गोव्यात होतात... तुम्ही सगळ्यांनी तुमचा आनंद खतरनाक साजरा केला... काय जोरदार डान्स केला, तुम्ही तिथं...! आपल्यातले काहीजण तर टेबलावर उभे राहून टेबल डान्स करत होते...!! आता तुमच्यातले नेमके कोण कोण मंत्री होणार.... त्यातही टेबलवर उभे राहून डान्स करणाऱ्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार...? हे असले प्रश्न गावाकडं लोक आम्हालाच विचारू लागले आहेत... काय उत्तर द्यावं कळेना बघा बापू.... तरी मी त्या लोकांना म्हणालो, आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याचा आनंद वेगळाच असतो... तो त्यांनी साजरा केला तर बिघडलं कुठे...? त्यासाठी डान्स केला त्यात काय एवढं...? पण बापू लोक भलते विचित्र... मला म्हणतात, उद्धव ठाकरे काय तुमचा माणूस नव्हता का..? ते मुख्यमंत्री झाल्यावर, असा डान्स का नाही केला..? आता ह्याला काही लॉजिक आहे का बापू...? ठीक आहे. लोक बोलतात बोलू द्या... पण त्या डान्स करणाऱ्यांना युवक कल्याण, सांस्कृतिक कार्य असली खाती दिली पाहिजे. खात्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील... बापू आपल्याकडे मात्र मराठी भाषा आणि संस्कृती हे खाते घेतलं पाहिजे..! तुम्ही फोनवरून जन्माला घातलेली, ‘काय ती झाडी... काय ते डोंगार... काय ते हाटील...’, ही कविता जगाच्या कानाकोपऱ्यात गेली..! तुमच्याकडे मराठी भाषा विभाग दिला तर तुम्ही मराठीचा झेंडा अटकेपार लावाल बापू, याविषयी आमच्या मनात काडीचीही शंका नाही...! 

जाता जाता, बापू एक विचारायचं राहिलं. त्या भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपद घेण्याचा आदेश दिला आणि पक्षाचा निष्ठावान पाईक असलेला हा बहाद्दर गडी, एका क्षणात ते पद स्वीकारायला तयार झाला..! वाघाचं काळीज लागतं बापू त्यासाठी... तुम्हाला काय वाटतं...? आपल्याला तर एकदम भारी वाटलं. त्यांना दुःख झालं असेलही... पण एका शब्दाने हूं की चूं केलं नाही पठ्ठ्यानं...! आधी राष्ट्र, नंतर पक्ष, सगळ्यात शेवटी मी... हे त्यांच्या पक्षाचे ब्रीदवाक्य. त्यामुळे पक्षाने आदेश देताच, देवेंद्रभाऊंनी खटकन निर्णय घेऊन टाकला, पण त्यावरसुद्धा राज ठाकरेंनी लगेच देवेंद्रभाऊंना पत्र लिहिलं आणि म्हणाले, ‘धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावीच लागते...’, भारी वाक्य आहे बापू... गावाकडच्या भाषेत या वाक्याचा, ‘लांब उडी मारायची असेल तर चार पावलं मागे जावं लागतं.’, असा अर्थ निघतो. त्यामुळे बापू आता प्रश्न असा पडला की, देवेंद्रभाऊंना लांब उडी तर मारायची नसेल...? म्हणजे त्यांचा डोळा मुख्यमंत्रिपदावर तर नसेल...? ते जाऊ द्या... मला एक सांगा बापू, देवेंद्रभाऊंनी जी पक्षनिष्ठा दाखवली. पक्षाचा आदेश येताच पक्षाने जे सांगितलं ते मान्य केलं. त्यांच्यासोबत आपले बंडखोरी करून बाहेर पडलेले आमदार आता मांडीला मांडी लावून बसणार... तेव्हा कोणी जर हे असं कसं म्हणून विचारलं तर...? आपण सांगायचं तरी काय...? आपलं तर डोकंच काम करेना झालंय... तुम्हाला काही समजलं तर सांगा... आणि आता बास झालं बाहेर फिरणं... या आता परत... मतदारसंघात काम खोळंबली आहेत... लोक वाट बघू लागलेत... नाही तर कायमचं घरी बसवतील.... 

    - तुमचाच, बाबूराव

Web Title: if the MLAs who dance in Eknath Shinde cabinet are made cultural ministers ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.