'पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल', सुमित्रा महाजन यांचे सूचक संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 10:35 AM2023-01-29T10:35:38+5:302023-01-29T10:36:08+5:30
Sumitra Mahajan: पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल; पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले.
डोंबिवली : पक्षाने ठरवले तर महाराष्ट्राचे पालक व्हायला आवडेल; पण आता वय झाले आहे. त्यातही नेशन आणि पार्टी फर्स्ट असल्याचे सूचक वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले. डोंबिवली येथे आयोजित पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्यात शुक्रवारी त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.
आठ वेळा इंदूरच्या खासदार राहिलेल्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन यांची पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी मुलाखत घेतली. त्या म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद यांनी भारत हा विश्वगुरू होणार हे सांगितले. आपल्या देशाची प्रगती सध्या याच पथावर आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. ठामपणे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे भारताबद्दल आदर निर्माण झाल्याचे गौरवाेद्गार त्यांनी काढले. या मुलाखतीत नगरसेविका ते लोकसभा अध्यक्षपदाचा त्यांनी प्रवास उलगडला.
लोकसभा अध्यक्षामुळे जबाबदारी वाढली
पै फ्रेंडस् लायब्ररीच्या पुढाकाराने आणि कल्याण-डोंबिवली महापालिका, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने पहिल्या बहुभाषिक पुस्तक आदान-प्रदान सोहळ्याच्या आठव्या दिवशी महाजन यांच्या भेटीचा अभूतपूर्व योग जुळून आला. लोकसभेचे अध्यक्षपद भूषवताना वेगवेगळ्या राज्यातील खासदारांबरोबर संवाद साधताना अडचण वाटली नसल्याचे महाजन यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षपदाचा पदभार सांभाळल्यावर जबाबदारी वाढली. अशावेळी कशाप्रकारे अभ्यास केला याचाही अनुभव महाजन यांनी सांगितला. यावेळी त्यांनी इंदूरमधील अहिल्याबाई स्मारकाची माहितीही दिली.
देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांचीही जबाबदारी
देशाची प्रगती साधण्याची जबाबदारी केवळ राजकीय नेत्यांची नाही, तर नागरिकांचीही आहे. आपण निवडून दिलेला नेता चुकीचे वागत असेल, तर मतदारांनी त्याला त्याची जाणीव करून दिली पाहिजे. आजकाल देवालाही वाटून घेतले जाते, तसेच मोठ्या माणसांनाही वाटून घेतले जात आहे, हा चुकीचा पायंडा आहे, असे त्या म्हणाल्या.
मानपत्र केले प्रदान
महाजन यांचा सत्कार पै फ्रेंडस् लायब्ररीतर्फे पुंडलिक पै यांनी केला. चित्रकार प्रभू कापसे यांनी काढलेले चित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी लिहिलेले मानपत्र सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माधव जोशी, दर्शना सामंत, मधुकर चक्रदेव, दीपाली काळे, वृंदा भुस्कुटे आदी उपस्थित होते.