लग्नात 100 हून जास्त लोक आल्यास पोलीस करणार पाहुणचार
By admin | Published: August 24, 2016 10:21 AM2016-08-24T10:21:28+5:302016-08-24T13:31:41+5:30
राज्य सरकारने एक असा मसुदा तयार केला आहे ज्यामुळे सत्यनारायण पूजा, वाढदिवसाची पार्टी, लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये विग्न येऊ शकतं
Next
>
- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - तुमच्या घरी एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असाल आणि त्यासाठी पाहुण्यांची यादी तयार करत आहात तर 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करणं तुमच्या अडचणी वाढवू शकतं. राज्य सरकारने एक अशा प्रकारच्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे ज्यामुळे सत्यनारायण पूजा, वाढदिवसाची पार्टी, लग्नासारख्या कार्यक्रमांमध्ये विघ्न येऊ शकतं. या मसुद्याचं कायद्यात रुपांतर झाल्यास 100 हून जास्त पाहुण्यांना आमंत्रित करताना पोलिसांची परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे.
महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सेक्युरिटी अॅक्टचं जर कायद्यात रुपांतर झालं तर अशा कार्यक्रमांमध्ये 100 हून जास्त लोकांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्यास किमान तीन वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड आकारला जाणार आहे. तशी तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
सरकारने या मसुद्यावर तज्ञ आणि सामान्यांकडून सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 19 ऑगस्टला हा मसुदा सरकारी वेबसाईटवर जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित असलेल्या गृह मंत्रालयाने हा मसुदा तयार केला आहे. विरोधी पक्षांनी मात्र या प्रस्तावित कायद्याला विरोध केला आहे. काळा कायदा उल्लेख करत काँग्रेस - राष्ट्रवादीने हा मुसदा मागे घेण्याची मागणी केली आहे.
या कायद्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत.
'सशस्त्र दल विशेष कायद्याप्रमाणे (आफ्सपा) महाराष्ट्र सरकारला पोलीस दल विशेष कायदा (पाफ्सपा) लागू करुन पोलिसांना असीमित अधिकार द्यायचे आहेत', अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
असा कायदा करणं तुम्हाला पटतं का ?...तुमच्या प्रतिक्रिया कळवा