पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:58 PM2023-08-25T12:58:38+5:302023-08-25T12:58:58+5:30
काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले.
अजित पवार हे आमचेचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फुट नसल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बारामतीतून कोल्हापूरच्या सभेला निघण्यापूर्वी पवारांनी हे वक्तव्य केले आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले. यावर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी वेळ साधली आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. भुजबळ, मुंडे आणि इतर नेते देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेच आहेत. आम्ही देखील त्यांना जाऊन भेटलो आहोत. पक्षात फूट पडली नाही असे ते म्हणत आहेत, मग आता त्यांनी आमच्या या कृतीला समर्थन द्यावे, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
नाफेड अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. आज संध्याकाळपर्यंत नाफेडची 32 केंद्र नाशिक मध्ये सुरू होणार आहेत. आज लिलाव सुरू झाले आहेत, 2100 ते 2200 रुपये आज भाव मिळत आहे. 2 लाख मेट्रिक केंद्र कांदा खरेदी करायचा आहे तर नाफेड कडून केंद्र वाढवावे लागतील असे मी सांगितले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होतं आहे याचं आम्हाला दुःख आहे. नुकसान कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.