...तर दुष्काळ पडणार नाही !

By admin | Published: September 19, 2015 09:18 PM2015-09-19T21:18:07+5:302015-09-19T21:18:07+5:30

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि

If there is no drought! | ...तर दुष्काळ पडणार नाही !

...तर दुष्काळ पडणार नाही !

Next

- उल्हास परांजपे (लेखक जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत.)

दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि येथेच आपण गल्लत करीत आहोत. पावसाच्या पाण्याची आपल्याकडून साठवणूक होत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. परिणामी महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट नाहीसे करावयाचे असेल तर पाणी साठविणे सर्वात महत्त्वाचे आहे.
मुंबई वगळता उर्वरित राज्याची परिस्थिती वेगळी आहे. शहरी भाग आणि ग्रामीण भागातील पाण्याची मागणी आणि पाण्याचा पुरवठा यात खूप मोठा फरक आहे. शहरी भागांना उर्वरित आठ महिने तलावांतील पाणी पुरविले जात असल्याने त्यांना फार काही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही, परंतु पाणीकपातीला सामोरे जावे लागते. आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठविण्यात येत नसल्याने पावसाळा वगळता पुढील आठ महिने येथील विहीर आणि तलाव कोरडे पडतात. नेमके हेच होऊ नये आणि भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून आपण बोअरवेल किंवा विहिरींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.
दुष्काळी भागात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून आता जो काही पाऊस पडतो, त्याचे पाणी साठविण्याची गरज आहे. त्यासाठी माध्यम विहीर, बोअरवेल अथवा तळी का असेनात. महत्त्वाचे म्हणजे पाणी साठणे आहे. कारण शुक्रवारी जो पाऊस झाला त्या पावसाचे कित्येक पाणी आतापर्यंत समुद्राला मिळाले असेल. आपल्याकडे हे पावसाचे पाणी साठविण्याची व्यवस्था नाही, हे दुर्दैव आहे. आणि जी व्यवस्था आहे, ती पुरेशी नाही. म्हणूनच पाणी अडविण्यासह ते जिरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह उर्वरित सर्व यंत्रणांचा समन्वय गरजेचा आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यासाठी काम होणे गरजेचे आहे.
विशेषत: ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. पिण्याचे पाणी असो वा शेतीसाठीचे पाणी. ग्रामीण भागातील पाण्याच्या नियोजनासाठी भूगर्भशास्त्रज्ञ अथवा भूगर्भजलज्ज्ञ यांची मदत घेतली तर सोन्याहून पिवळे आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची याकामी मदत घेतली तर पाण्याचे निम्मे प्रश्न सुटतील. शिवाय पाण्याचा पुनर्वापर केला तरी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार नाही. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे हा, की पाण्याची मागणी काही केले तरी ती वाढणारच. त्या तुलनेत पुरवठा मात्र वाढणार नाही. म्हणून जलसाठ्यांची काळजी घेतली तर निश्चितच दिलासा मिळेल.
दुसरे असे की मुंबईसारख्या मोठ्या शहरांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत नाही. त्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पाणीकपात झाली तरी त्यांना दररोज पाणी मिळते. ग्रामीण भागात असे होत नाही. मुंबईला हा प्रश्न भेडसावत नाही. कारण त्यांना लागणाऱ्या पाण्यासाठी जलसाठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईला एकूण सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. हे जलसाठे भरल्यास पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत नाही. मात्र मुंबईत वाया जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न तोंड आ वासून उभा आहे. मुंबईतल्या वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन केले तर मुंबईकर पाणीकपातीवरही सहज मात करतील.

 

Web Title: If there is no drought!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.