धरमशालेच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन न झाल्यास देशावर संकट कोसळेल का? उद्धव ठाकरे
By admin | Published: March 9, 2016 12:38 PM2016-03-09T12:38:02+5:302016-03-09T12:47:35+5:30
टी-२० वर्ल्डकपदरम्यान हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होणा-या भारत-पाक सामन्यासाठी सुरक्षेची हमी देणा-या केंद्र सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - टी-२० वर्ल्डकपदरम्यान हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे होणा-या भारत-पाक सामन्यासाठी सुरक्षेची हमी देणा-या केंद्र सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे. ' धरमशालेतील क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन झाले नाही तर देशावर संकटाचा पहाड कोसळणार आहे का? असा सवाल उद्धव यांनी विचारला. ' अयोध्येत रामाच्या पादुका आजही बेवारस आहेत, पण धर्मशालेत पाकड्यांच्या पादुकांचे पूजन दिल्लीश्वर करणारच असतील तर देशाची जनता वीरभद्र बनून जोडे मारल्याशिवाय राहणार नाही' असा कडक इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
'दिल्लीश्वरांचे पादुकापूजन!' या मथळ्याखाली लिहीलेल्या अग्रलेखात उद्धव यांनी सरकारवर घणाघाती टीका केली असून आता पुन्हा भाजपा वि. शिवसेना असे युद्ध रंगण्याची शक्यता आहे. १९ मार्च रोजी धरमशाला येथे भारत वि. पाकिस्तान सामना आयोजित करण्यात आला असला तरी राज्य सरकारने त्यास विरोध दर्शवल्याने या सामन्याबाबत अद्याप साशंकता आहे. 'धरमशाला, कांगडा येथे पाकबरोबर क्रिकेट खेळणे म्हणजे सैनिकांच्या बलिदानांचा अपमान ठरेल. तेथे अनेक सैनिक तसेच शहीद सैनिकांची कुटुंबे राहतात. त्यांच्या भावनांचा आदर राखायला हवा, असे सांगत' हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी हा सामना खेळवण्यास नकार दिला. मात्र केंद्र सरकार सामना खेळवण्याच्या भूमिकेवर ठाम असून त्याच मुद्यावरून उद्धव यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच राज्यकर्त्यांनी या देशात धर्म नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवली आहे का? असा सवालही उपस्थित केला.
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
- हिंदुस्थानचा ‘धर्म’ नक्की कोणता? मुळात राज्यकर्त्यांनी या देशात धर्म नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवली आहे का? सगळ्या धर्मांच्या वर ‘राष्ट्रधर्म’ नावाचा एक प्रकार आहे व त्याच राष्ट्रधर्माची पुरती वाताहत झालेली आता दिसत आहे. ‘धर्मशाले’त पाकड्यांबरोबर क्रिकेट सामना खेळायचा म्हणजे खेळायचाच असे सध्याच्या दिल्लीश्वरांनी मनावर घेतलेले दिसते. १९ मार्चला हिमाचलमधील धर्मशालेत पाकबरोबरचा जो सामना होत आहे त्यास तेथील मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी विरोध केला. हा विरोध राजकीय नाही, धार्मिक तर अजिबात नाही, तर राष्ट्रधर्माचे पालन करण्यासाठी आहे. धर्मशाला, कांगडा येथे पाकबरोबर क्रिकेट खेळणे म्हणजे सैनिकांच्या बलिदानांचा अपमान ठरेल. कांगडा परिसरात अनेक सैनिक राहतात. शहीद सैनिकांची कुटुंबे राहतात. त्यांच्या भावनांचा आदर राखायला हवा, असे जर हिमाचलचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर तो ‘राजद्रोह’ किंवा देशद्रोहाचा गुन्हा ठरवून तुम्ही त्यांना फासावर लटकवणार का? अर्थात सैनिकांच्या भावना पायदळी तुडवून आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधाला न जुमानता दिल्लीश्वरांनी धर्मशालेत अधर्माची हिरवी पताका फडकवायचीच असा अफझलखानी विडा उचललेला दिसतोय.
- धर्मशालेतील क्रिकेट सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार, असे आता टी-२० सामन्यांचे संचालक एमबी श्रीधर यांनीही सांगितले आहे. दुसरीकडे दिल्लीश्वरांनी कठोर शासनकर्त्यांच्या भाषेत बजावले आहे की, ‘पाकड्यांसाठी धर्मशालेत पायघड्या घालणार म्हणजे घालणारच. पाकड्या क्रिकेटपटूंना सुरक्षा पुरवणे वीरभद्र सरकारला झेपत नसेल तर दिल्लीश्वर पाकड्यांच्या सुरक्षेचा खास बंदोबस्त करतील व पाकड्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीत.’ व्वा, शाब्बास! काय हा सुरक्षेबाबतचा आत्मविश्वास! हा आत्मविश्वास इतर वेळी कुठे पेंड खातो ते कळत नाही. आमच्या सुरक्षा यंत्रणा इतक्या मजबूत आहेत की पाकडे अतिरेकीच काय, पण तिकडील पाखरूही हिंदुस्थानच्या हद्दीत घुसू शकत नाही, असा काही आत्मविश्वास या मंडळींकडे आहे का? दिल्लीश्वर धर्मशालेत पाकड्या क्रिकेटपटूंचे संरक्षण स्वत: करणार आहेत. पण पाकिस्तानी सुरक्षा दलाचे एक पथकही धर्मशालेत पोहोचले व हिंदुस्थानचे सुरक्षा दल पाकड्यांच्या रक्षणासाठी काबील आहे की नाही याची सूक्ष्म पाहणी त्या पथकाने केली.
- पठाणकोटच्या हल्ल्यानंतरही म्हणे पाकिस्तानचे ‘तपास पथक’ पंजाबात येऊन पाहणी करणार होते. हा तर शहीदांचा अपमान आणि तमाशाच म्हणावा लागेल. पाकड्यांसाठी पायघड्या घालणे हे तर आता नित्याचेच होऊन बसले. सरकारे बदलली तरी या कर्तव्यात कोणी कसूर करीत नाही. पण आता तर पायघड्या नाही, तर पाकड्यांच्या पादुका (जोडे) सिंहासनावर ठेवून कारभार केला जात आहे का? असा प्रश्न शहीदांच्या विधवांना व त्यांच्या अनाथ पोराबाळांना पडला तरी आश्चर्य वाटायला नको. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणखी एक ‘जीना’ निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी चिंता भाजपचे ज्वलंत खासदार योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली व ती योग्यच आहे. पण धर्मशालेत जर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन करण्याचा सोहळा पार पडलाच तर कबरीतला जीनादेखील अत्यानंदाने टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाही.
- आमचा एक सिधासाधा सवाल आहे, जर धर्मशालेतील क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन झाले नाही तर देशावर संकटाचा पहाड कोसळणार आहे काय? पाकड्यांच्या पादुकांचे पूजन होताच लाखो कोटींचा काळा पैसा धरती फाडून बाहेर येणार आहे, की महाराष्ट्रासह देशभरातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबणार आहेत? कश्मीर खोर्यात शांतता नांदून आमच्या सैनिकांच्या स्वागताच्या कमानी तेथे उभारल्या जातील की ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे बंद होऊन ‘भारतमाता की जय’ हा घोष सुरू होईल?