‘त्या’ जाहिरातीमागे दोन ताईंमधील तणाव तर नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:13 AM2019-01-19T06:13:41+5:302019-01-19T06:13:49+5:30
बालहक्क आयोगासाठी दिली होती जाहिरात; - विभाग म्हणतो, नव्याने जाहिरात देऊ
- यदु जोशी
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर असताना त्यांना पूर्वकल्पना न देता नव्या अध्यक्षाच्या भरतीसाठी महिला व बालकल्याण विभागाने जाहिरात देण्यामागे रहाटकर आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील ‘सलोख्याचे’ संबंध कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
मुंडे आणि रहाटकर या दोघीही मराठवाड्यातल्या पण दोघींमध्ये फारसे सख्य नसल्याचे बोलले जाते. रहाटकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. हा आयोग पंकजातार्इंच्या विभागाच्या अखत्यारित येतो. तीन वर्षांपूर्वी विजयातार्इंची नियुक्ती झाली तेव्हा अध्यक्ष वा सदस्य पदासाठी जाहिरात देण्यात आलेली नव्हती. रहाटकर यांची नियुक्ती ‘वरून’झाल्याचे बोलले गेले. त्यांचे दिल्लीतही मोठे वजन आहे. गेली तीन वर्षे आयोग आणि महिला व बालकल्याण विभागाचे संबंध सलोख्याचे राहिलेले नाहीत.
महिला आयोगाच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी एकदाही जाहिरात देण्यात आली नाही. मग ती आताच का देण्यात आली? दोन तार्इंमधील तणावाचा अशी जाहिरात येण्यामागे काही संबंध आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. विजयाताई अध्यक्ष झाल्यानंतर काहीच महिन्यांत राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी पंकजातार्इंच्या मर्जीतील विजय घुगे यांना नेमण्यात आले तेव्हा मात्र जाहिरात देण्यात आली होती. जवळपास दीडएकशे अर्ज आले. घुगे यांनी अर्जच केलेला नव्हता तरीही त्यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले.
बालहक्क आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जाहिरात दिली जाते मग महिला व बालकल्याण विभागाच्याच अखत्यारित येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी जाहिरात का देऊ नये, असे समर्थनही पुढे आले आहे. विहार दुर्वे या नागरिकाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारीला संपत असल्याने नवीन अध्यक्ष नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत महिला व बालकल्याण विभागाला सूचित केले होते. मात्र, जाहिरात द्या असे काही म्हटले नव्हते.
मुळात महिला आयोगाचे अध्यक्षपद जाहिरातीने भरले जाणार असल्याबाबत विजयातार्इंना कुठलीच कल्पना नव्हती. जाहिरात प्रसिद्ध होताच अस्वस्थ झालेल्या विजयातार्इंनी मग आपले वजन वापरत जाहिरातच रद्द करविली, असे सूत्रांनी सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता वेद सिंघल यांना या बाबत विचारले असता त्या म्हणाल्या की अध्यक्षासाठीच्या जाहिरातीत त्या पदासाठी नेमकी कोणती शैक्षणिक पात्रता व अनुभव हवा आहे या बाबत स्पष्टता नसल्याने जाहिरात रद्द करण्यात आली. ती नव्याने दिली जाईल.
‘काहीच कल्पना नाही’
रहाटकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, या घडामोडींची मला कल्पना नाही. अध्यक्षपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत राहणे हे माझे कर्तव्य आहे. ते मी करते.