विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काही उरणार नाही - श्रीहरी अणे
By admin | Published: January 14, 2016 01:06 PM2016-01-14T13:06:30+5:302016-01-14T13:25:10+5:30
विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे वक्तव्य करत महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी केल्याने वादात सापडलेले महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भवरून पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ' विदर्भ झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही' असे अणे यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान म्हटले असून आता पुन्हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे या मुद्यावर जनचाचणी घेण्यात यावी, असे वक्तव्य अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केले होते. वेगळ्या विदर्भाच्या नावावर तेलंगणाप्रमाणे केवळ हिंसक आंदोलन अभिप्रेत असल्याची टीकाही अणे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून खवळलेल्या शिवसेनेने अधिवेशनात गदारोळ माजवला होता. अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेनेने हक्कभंग प्रस्तावही आणला होता. तो वाद शमतो ना शमतो तोच अणे यांनी विदर्भावरून नवे वक्तव्य करत नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.
श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी असून गेल्याच महिन्यात शिवसेना आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणा-या शिवसेना नेत्यांनी अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहीजे असे सेना आमदारांचे म्हणणे आहे.
विदर्भातलं जनमत घेतलं तर ८० टक्के लोक स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असतील, असे वक्तव्य अणे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं