Maharashtra Election 2019; सत्तेची लालसा असती तर कधीच पक्ष सोडला असता : प्रणिती शिंदें
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 10:58 AM2019-10-12T10:58:11+5:302019-10-12T11:58:37+5:30
प्रणिती शिंदेंचा विरोधकांना टोला: आरोप करणाºयांनी आत्मपरीक्षण करावे
सोलापूर : मला सत्ता वा पदाची लालसा नाही. जर असती तर कधीच मी काँग्रेस पक्ष सोडला असता. केवळ जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात आहे, असा प्रतिटोला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे बोलताना विरोधकांना लगावला.
अक्कलकोट रोडवरील रमणनगर येथे आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या. आमदार शिंदे म्हणाल्या की, माझ्यावर आरोप करणाºयांनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता असूनही शहरातील विकासकामे झाली नाहीत. तर दुसरीकडे सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या मारणाºयांची टोळीच तयार झाली आहे. अशा मंडळींनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना साथ दिली नाही तर ते तुम्हाला तरी साथ कशी देतील. महाराष्ट्रात सत्ता कोणाचीही येऊ द्या, मी मात्र इथल्या जनतेसाठी काम करणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दूरदृष्टी ठेवून शहरासाठी अनेक विकासाची कामे केली. उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीची योजना त्यांनीच आणली. आहेरवाडी येथे एनटीपीसीचा प्रकल्प आणल्यावर त्यांनी शहराला जलवाहिनी देण्याची अट घातली. यामुळेच दुसरी जलवाहिनी मिळत आहे. १९९२ मध्ये सोलापूर ते उजनी जलवाहिनी त्यांच्यामुळेच आली. त्यामुळे दुष्काळात इतर शहरांना रेल्वेने पाणी आणले गेले पण सोलापूर शहरासाठी पाण्याची सोय झाली. पण आता महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून परिस्थिती वेगळीच आहे. उजनी धरण शंभर टक्के भरून एक महिना झाला. धरणात मुबलक पाणीसाठा असूनही शहराला मात्र सहा ते सात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली असा सवाल आमदार शिंदे यांनी केला.
महापालिकेत, राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून हद्दवाढ भागाचा विकास रखडला आहे, असा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी सिद्धाराम कळमंडे यांनी भाषणात हद्दवाढ भागातील रस्ते व पाणीपुरवठ्याची विदारक स्थिती मांडली. या भागात सुविधा मिळण्यासाठी आमदार शिंदे यांनी पाठपुरावा केला. गरिबांसाठी विविध योजना आणल्याचे नमूद केले. यावेळी धोंडप्पा तोरणगी, सिद्धाराम पाटील, दयानंद जाधव, विश्वनाथ शेटे, शिवराज चिलगुंडे, सुनील पाटील, अक्षय पाटील, अनिल पाटील, महादेव रामदे, सागर शेरखाने, मनीष सोनकवडे आदी उपस्थित होते.