मोदींचा फोटो असता तर तेलगी घोटाळा वाटला असता
By admin | Published: February 8, 2017 05:19 AM2017-02-08T05:19:21+5:302017-02-08T05:19:29+5:30
गेली २५ वर्षे वचननामा शिवसेनेचा होता आणि विकास कामांवर फोटो मात्र भाजपाचा. डोकं कधी चालवलं नाही, पण खाजवायचं तरी
मुंबई : गेली २५ वर्षे वचननामा शिवसेनेचा होता आणि विकास कामांवर फोटो मात्र भाजपाचा. डोकं कधी चालवलं नाही, पण खाजवायचं तरी. भाजपाने जाहीरनाम्यावर स्टॅम्प पेपर दाखवला. मोदी का नाही दाखवले? मोदींचा फोटो असता, तर तेलगी घोटाळा वाटला असता, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाटकोपर येथील सभेत भाजपाच्या जाहीरनाम्यावर केली.
भाजपाने एवढी वर्षे शिवसेनेचा आयता वचननामा वापरला. शिवसेना जे वचन देते ते पूर्ण विचार करूनच देते. आम्ही शिवसेनाप्रमुखांना वंदन करून वचननामा मुंबईकरांसमोर ठेवला. रोड टॅक्स नाही, तर पथकर महापालिका घेते. पथकर हा मालमत्ता करात असतो, असा ठाकरे यांनी टोला भाजपाला लगावला. टॅब देत प्रगत प्रशिक्षण देणारी देशात पहिली महापालिका ही मुंबई महापालिका आहे. शिवसेनेने विद्यार्थ्यांचे भले केले की नाही हे विचारावे. २५ वर्षांत मान खाली घालावी लागेल, असे एकही काम शिवसेनेने केलेले नाही. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना गलिच्छ राजकारण पुढे आणत असाल, तर त्याला आम्हीही तयार आहोत, असे ठाकरे यांनी भाजपाला आव्हान दिले. कुणाची औकात कुणाला दाखवायची, हे शिवसैनिक दाखवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली. या संदर्भात पटेल युती करण्यासाठी आला नव्हता. हार्दिक पटेल मातोश्रीवर आल्याने काहींच्या पोटात मात्र गोळा आला. मोदी आणि फडणवीस तुम्ही दोघेही एकत्र या, दोघांनाही एकत्र निपटून टाकतो, असे आव्हानही दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यकारभाराकडे लक्ष द्यावे. तुम्ही काय केले हे सांगा आणि पारदर्शकतेवर बोला. कल्याण-डोंबिवली येथील २७ गावांची मुख्यमंत्र्यांनी तर फसवणूकच केली. वेगळी महानगरपालिका तयार करण्याच्या आश्वासनावरून मुख्यमंत्र्यांनी पलटी मारली. त्यामुळे आम्हाला कुठल्याही स्टॅम्पपेपरची गरज नाही. दहशतवादी हल्ल्यात बळी कमी गेले, पण नोटाबंदीने अधिक बळी गेले. मग हा दहशतवादी हल्ला कुणी केला? असे सांगून उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला. (प्रतिनिधी)