‘ते’ साडेसहा टीएमसी वाचले नसते तर... पाणीबाणी
By admin | Published: May 9, 2016 12:53 AM2016-05-09T00:53:18+5:302016-05-09T00:53:18+5:30
सोलापूरसाठी उजनी धरणात ९.४० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबरला जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिला होता. आमदार भारत भेलके यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला होता.
बापू बैैलकर , पुणे
सध्या खडकवासला प्रणालीतून दौंड, इंदापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने शहर-ग्रामीण असा वाद रंगला आहे. मात्र, उजनीत वरच्या धरणातून पाणी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी व याचिकाकर्त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे जानेवारीत आपले साडेसहा टीएमसी पाणी वाचले. ते पाणी उजनीत गेले असते तर आज खडकवासलातून दौंड, इंदापूरला पाणी मिळालेच नसते, उलट पुणेकरांनाही मोठी पाणीकपात सहन करावी लागली असती. पाणी पाणी करण्याची वेळ सर्वांवरच आली असती.
सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आद्र्रा व वडीवळे या धरणांमधून सोलापूरसाठी उजनी धरणात ९.४० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबरला जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने दिला होता. आमदार भारत भेलके यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला होता.
या निर्णयामुळे तीन महिने उजनीत पाणी सोडण्याचा प्रश्न ढवळून निघाला होता. पुणे जिल्ह्यात या निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले होते.
या निर्णयावर स्थगिती मिळवणे गरजेचे होत, अन्यथा पाणी उजनीत गेले असते. याचवेळी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच उजनीत पाणी सोडण्याच्या एका याचिकेवरही स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे उजनीत हे पाणी जाणारच, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी हे पाणी गेले तर जिल्ह्यात पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी खंबीर भूमिका घेतली व आपली बाजू ठामपणे मांडली. त्यामुळे सुटीतही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे शक्य झाले.
त्यामुळे उच्च न्यायालयात अॅड. सुरेश पलांडे व धैर्यशील पलांडे यांनी याचिका दाखल केली आणि पाणी सोडण्यास स्थगिती घेतली. त्यानंतर हायकोर्टाने प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, यासाठी हे प्रकरण प्राधिकरणाकडे पाठविले. ६ जानेवारी २०१६ रोजी सुनावणी होऊन पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय प्राधिकरणाने दिला. यामुळे जिल्ह्यातील साडेसहा टीएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. यात मुळशी, कासारसाई, आंध्रा व वडिवळे यातील पूर्ण पाणी वाचले, तर भामा आसखेड, चासकमानमधील पाणीही काही प्रमाणात वाचले.
चासकमान धरणात फक्त ३९.८५ दलघमी पाणी राहिले असते. लाभक्षेत्रातील रब्बी पिकांसाठी एकच आवर्तन मिळाले
असते. पुढील सहा महिने शेतकऱ्यांना
तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले असते.चासकमान व भामा आसखेड धरणाखालील ४० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र त्या पाण्यावर अवलंबून होते. त्या क्षेत्रावरील पिके करपली असती.
टंचाईकाळात आता चासकमान, भामा आसखेड, व खडकवासलातून जे पिण्याचे आवर्तन सोडले आहे ते सोडता आले नसते आणि पाण्यावरून मोठा संघर्ष निर्माण झाला असता. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे आम्हाला उच्च न्यायालयात याचिका दाखल करता आली आणि पाणी सोडण्यावर स्थगिती घेता आली. याचा परिणाम म्हणून साडेसहा टीएमसी पुण्याचे पाणी वाचले. यात जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरली अन्यथा पाण्याची परिस्थिती भीषण झाली असती. - अॅड. सुरेश पलांडे, याचिकाकर्ते