वाहतुकीला अडथळा ठरल्यास देणार समज
By admin | Published: August 2, 2016 05:54 AM2016-08-02T05:54:30+5:302016-08-02T05:54:30+5:30
स्मार्ट फोनवर सध्या चर्चेत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ गेममुळे वाहतूक पोलीसही सावध झाले आहेत.
मुंबई : स्मार्ट फोनवर सध्या चर्चेत असलेल्या ‘पोकेमॉन गो’ गेममुळे वाहतूक पोलीसही सावध झाले आहेत. हा गेम खेळता-खेळता एखाद्याकडून वाहतुकीत अडथळा आल्यास त्याला पोलिसांकडून समज दिली जाणार आहे. याबाबतच्या सूचनाच वरिष्ठांकडून सर्व वाहतूक पोलीस चौक्यांतील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
मोबाइलवर सध्या पोकेमॉन गो गेमने अनेकांना वेड लावले आहे. जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या गेममुळे अनेकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा गेम खेळण्यावर बंदीही आणण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा गेम सगळ्यांना एकत्र येऊन खेळता यावा यासाठी मुंबईत खासगी आयोजकांकडून ‘पोकेवॉक’ गेमही आयोजित करण्यात आले आहेत.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही आमदारांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. एकूणच सर्व परिस्थिती पाहता वाहतुकीला कोणताही अडथळा ठरू नये आणि अपघात होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
>वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी सांगितले की, हा गेम खेळताना वाहतुकीस अडथळा येऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना वाहतूक चौक्यांना दिल्या आहेत.