उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 10:21 AM2019-05-30T10:21:48+5:302019-05-30T10:23:04+5:30
शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशी चर्चा होती.
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीवेळी काही नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मित्रपक्षांच्या एका खासदाराला मंत्रिपद देण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी खासदार अरविंद सावंत यांचे नाव सुचविले आहे. यामुळे सावंत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशी चर्चा होती. यामध्ये अरविंद सावंत यांच्यासह संजय राऊत यांना उपसभापतीपद आणि गजानन किर्तीकर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, पहिल्या टप्प्यात एनडीएतील मित्रपक्षांना एकच मंत्रीपद देण्याचे ठरविण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता होती.
यावर संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच पुढील काळात किती मंत्रीपदे मिळतात हे समजेल असे सूचक वक्तव्य त्यांनी करत आम्ही पाहत राहू, असे म्हटले आहे. शिवसेनेमध्ये सावंत यांच्या नावामुळे नाराजी असल्याचे म्हटले जात होते, या वृत्ताचेही त्यांनी खंडन केले.
उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यासच आपण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेच्या वाटेला येणाºया दोन राज्यमंत्रीपदासाठी शिवसेनेतील एकमेव महिला खासदार भावना गवळी (यवतमाळ), बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांची नावे आघाडीवर आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता व कोकणात शिवसेना मजबूत करून नारायण राणे यांना शह देण्यासाठी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांचीही राज्यमंत्री म्हणून वर्णी लागू शकते. उद्धव ठाकरे, आदित्य आणि रश्मी ठाकरे, मिलींद नार्वेकर हे शपथविधी सोहळ््यात सहभागी होण्यासाठी बुधवारी रात्री उशीरा दिल्लीत पोहोचले आहेत.