"...तरच मी सल्ला मानला असता", प्रकाश आंबेडकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; युतीत ठिणगी?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 12:51 PM2023-01-27T12:51:34+5:302023-01-27T12:52:58+5:30

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला.

if uddhav thackeray told me only then would I have taken advice says Prakash Ambedkar reply to Sanjay Raut remarks | "...तरच मी सल्ला मानला असता", प्रकाश आंबेडकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; युतीत ठिणगी?

"...तरच मी सल्ला मानला असता", प्रकाश आंबेडकर यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर; युतीत ठिणगी?

googlenewsNext

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपूर वापरायला हवेत असा सल्ला दिला. आता राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सांभाळून बोला हे मला ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे शिवशक्ती-भिमशक्ती युतीला चारच दिवस झालेले असताना युतीत ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

"देशात कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कोणताही भारतीय एकमेकांचा शत्रु होऊ शकत नाही. दोन राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण शत्रुत्व अजिबात नाही. मनुस्मृतीच्या मुद्द्यावरुन आमचे भाजपासोबत टोकाचे मतभेद आहेत आणि ते राहतील. जर भाजपानं मनुस्मृतीची विचारधारा सोडण्याचा निर्णय घेतला तर आमचेही मतभेद टळतील", असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

'प्रकाश आंबेडकरांच्या विधानाशी सहमत नाही; त्यांनी जपून बोलावं', संजय राऊत स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. "प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे", असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला. 

संजय राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं. "मला उद्धव ठाकरेंनी सांभाळून बोला असं सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

...तर भाजपासोबतही एकत्र बसायला तयार
"कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु नाहीत. जे जे राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी, मतदार आहेत ते भारतीय आहेत आणि भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकचे मतभेद असू शकतात. भाजपा आणि आरएसएस सोबत आमचे टोकाचे मतभेत आहेत. ते अनेकवेळा मांडलेले आहेत. आरएसएस आजही मनुस्मृतीला मानेत आणि आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधात आहे. मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत राहून राज्य करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्यासोबत एकत्र बसायला तयार आहोत. मनुस्मृती कुठलाही धर्मग्रंथ नाही. ती हिंदू धर्मातील सामाजिक आणि राजकीय व्यवस्था कशी असावी हे सांगणारा तो ग्रंथ आहे. हे जर बदलणार असेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून काम होणार असेल तर आम्ही एकत्र बसायला तयार आहोत", असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Web Title: if uddhav thackeray told me only then would I have taken advice says Prakash Ambedkar reply to Sanjay Raut remarks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.