"स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे अन्..."; भाजपाचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 01:38 PM2024-08-08T13:38:27+5:302024-08-08T13:39:13+5:30

"ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्री वर चर्चेसाठी आले व योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही."

If wants to see the simple meaning of loss of self respect, people should look at Uddhav Thackeray says bjp Keshav Upadhye | "स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे अन्..."; भाजपाचा निशाणा

"स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे अन्..."; भाजपाचा निशाणा

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान संबंधित नेत्यांची जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. यावरून आता भारतीय जनता पार्टीचे राज्याचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, "स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाकडे बघावं," असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत उपाध्ये म्हणाले, "स्वाभिमान गमावणे ह्याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठा कडे बघावं. 25 वर्षं भारतीय जनता पक्षासोबत वैचारिक तत्वांवर आधारलेली युती, जी प्रत्यक्ष स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांसारख्या महाराष्ट्राच्या धुरिणांनी काँग्रेसला सत्तेबाहेर करण्यासाठी अस्तित्वात आणली होती. भाजपा सोबत लढताना 125 पेक्षा जास्त जागांवर लढणारी शिवसेना, म्हणजे आताची उबाठा कशाबशा 100 जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे. दिल्लीपुढे आम्ही झुकत नाही, आमचा स्वाभिमान झुलवत नाही, आम्ही कोणाला विचारायला जात नाही, म्हणून डरकाळ्या फोडणारे ठाकरे आज दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत आहेत."

उपाध्ये पुढे म्हणाले, "ज्या अमित शहांची तुलना उद्धव ठाकरेंनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्री वर चर्चेसाठी आले व योग्य तो सन्मान दिला. पण वैचारिक भिकेचे डोहाळे लागलेल्या उद्धव ठाकरेंना ते पटले नाही. ज्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी आणि सत्तेच्या हव्यासापोटी भाजप सोबतची युती तोडली, ती सत्ता तर गेलीच, पक्षही गेला. चुकून आणि दुर्दैवाने मिळालेलं मुख्यमंत्रीपदही गेलं आणि आता ज्यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्रीपद स्वीकारले असे उध्दव ठाकरे सांगत होते, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट म्हणजेच महविकास आघाडी आज तुमचे नावही मुख्यमंत्रिपदासाठी घेत नाहीये."

एवढेच नाही तर, "एकेकाळी ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या जायच्या, जे जागा वाटप करण्याचे सूत्र ठरवायचे,  तेच आज जागांचा जोगवा मागत फिरत आहेत," असेही उपाद्धे म्हणाले. 

Web Title: If wants to see the simple meaning of loss of self respect, people should look at Uddhav Thackeray says bjp Keshav Upadhye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.