...तर सगळे आमदार राजीनामा देऊ, सरकार राहणार नाही; नरहरी झिरवाळ यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 12:12 PM2023-10-13T12:12:40+5:302023-10-13T12:13:12+5:30
१६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका असं झिरवाळ म्हणाले.
मुंबई – आम्हाला घटनेने जे आरक्षण दिलंय ते ४७ जातींना दिले. त्यात ४८ वा कोण मान्य करेल? समाजाने आमच्यावर रोष व्यक्त केला. तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या. आम्ही पक्षप्रमुखांकडे राजीनामा देऊ. कुणाला किती आरक्षण द्यायचे हे सरकारने ठरवावे पण आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नाही यासाठी आम्हाला काहीही करायची वेळ आली तरी आम्ही करू असा इशाराच विधानसभेचे उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिला आहे.
नाना झिरवाळ म्हणाले की, आदिवासी समाजाच्या प्रमाणपत्रावर निवडून आलेले सर्व आमदार राजीनामा देतील. २५ आमदार आहेत. पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा दिला, तरी एकाच पत्रावर राजीनामा लिहू आणि देऊन टाकू. आम्ही २५ जणांनी मनावर घेतले तर कुठलेही सरकार राहत नाही. हा घरचा आहेर नाही, आम्ही सरकारमध्ये असू पण सरकार आणि आमदार नंतर, सर्वात पहिले आमचा समाज, आदिवासी, मी आदिवासी नसतो तर आम्ही आमदार झालो असतो असं वाटते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच २५ आमदार गेले तर जा असं कुठला पक्ष म्हणेल, कारण आम्ही २५ आमदार असलो तरी प्रत्येक मतदारसंघात ५० हजारांच्या वर आदिवासी मतदार आहेत असंही त्यांनी म्हटलं.
तसेच लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे. कुठे सभा, आंदोलन घ्यावीत हा त्यांचा हक्क आहे. धनगर आहे की धनगड यापेक्षा आम्ही ४७ जाती आदिवासी आहोत. लोकं आता खुळी राहिली नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. धनगर हे मेंढपाळ आहेत, त्यांच्यात आणि आमच्यात कुठलेही साम्य नाही. रुढी, परंपरा ताळमेळ नाही असंही नाना झिरवाळ यांनी म्हटलं.
१६ आमदारांच्या अपात्रेवर बोलणं टाळलं
अपात्रतेविषयी नका काढू, विधानसभा अध्यक्ष म्हटलेत, जो निर्णय असेल ते घेतील, ते कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे चुकीचा निर्णय घेणार नाहीत असं झिरवाळ यांनी म्हटलं. त्यावर पत्रकारांनी तुम्ही १६ आमदार अपात्र होतील असं ठामपणे सांगत होता, त्यावर तेव्हाचे तेव्हा, आत्ताचे आज समाजाबद्दल बोलणार, १६ आमदारांच्या अपात्रतेवर भाष्य करायचे नाही. १६ आमदारांना अपात्र करण्याचा विषय अध्यक्षांचा आहे. काय असेल तो निर्णय ते घेतील. मला त्यावर विचारू नका. उपाध्यक्षांचा विषय येत नाही असं म्हणत झिरवाळ यांनी अपात्रतेवर बोलणे टाळले.