इतरांनी केली तर खुद्दारी, पण आम्ही केल्यावर गद्दारी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 06:46 PM2017-10-13T18:46:33+5:302017-10-13T19:15:04+5:30
इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मुंबई- इतरांनी केली तर खुद्दारी व आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, सहा मनसे नगरसेवक अधिकृतरीत्या शिवसेनेचे झालेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. एका दिवसात शिवसेना इतकी जमवाजमव करत असेल, तर ताकदीचा अंदाज आलाच असेल. आता फोडाफोडी झाली नाही, आधी झाली होती, जुने सहकारी पुन्हा शिवसेनेत आले आहेत. स्वतःही नगरसेवक परत येत असतील तर मी दार का बंद करून घेऊ, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आम्ही दुस-या पक्षातून नगरसेवक घेतले तर मित्र पक्षाच्या पोटात दुखायचं कारण काय ?, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं आमच्या आनंदात सहभागी झालं पाहिजे. घोडेबाजाराचा आरोप गाढवांनी करू नये, नाव न घेता उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांवर टीका केली आहे.
भांडुप पोटनिवडणुकीनंतर हालचाली
काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपला याचा थांगपत्ताही लागला नाही.
भाजप बॅकफुटवर
शिवसेनेच्या या खेळीनं भाजप सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक
अर्चना भालेराव – वॉर्ड 126
परमेश्वर कदम – वॉर्ड 133
अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
दिलीप लांडे – वॉर्ड 163
संजय तुर्डे – वॉर्ड 166
हर्षल मोरे – वॉर्ड 189
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
शिवसेनेकडून घोडेबाजार
‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरु झाला आहे. यासंबंधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु.’ अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढ
मुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान
‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88
भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
कॉंग्रेस – 30
राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
मनसे – 7
सपा – 6
एमआयएम – 2