...तर कार्यकर्त्यांनो हात ‘सोडा’
By admin | Published: March 20, 2016 02:34 AM2016-03-20T02:34:00+5:302016-03-20T02:34:00+5:30
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्यासाठी सर्वांनाच वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा वापर करून होळी खेळू नये, असे आवाहन
ठाणे : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाण्यासाठी सर्वांनाच वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा वापर करून होळी खेळू नये, असे आवाहन मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. यापुढेही जाऊन इतरांनाही हात जोडून होळी न खेळण्याचे आवाहन करा. मात्र, त्यानंतर परिणाम न झाल्यास मनसेच्या पद्धतीने थेट हात सोडून सांगा, असे आदेश मनसैनिकांना दिले. तसेच त्यांनी या वेळी खास शिवजयंतीसाठी तयार केलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचेही अनावरण केले.
शनिवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या वेळी पुढील उपक्रमाविषयी माहिती देतानाच होळीच्या सणाचा उल्लेख करून पाण्याच्या विषयावर आक्रमक होण्याचे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. होळी सणाच्या उत्सवात राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना थेट हात सोडण्याचे आदेश दिल्याने होळी उत्सव काळात कोणी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला मनसैनिकांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
यामुळे एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे होळी साजरी केल्यास राज यांच्या आदेशानुसार मनसैनिकांनी विरोध केल्यास तवाणाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिवजयंती उत्सव यंदा गणेशोत्सवाच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यास त्यांनी या वेळी सांगितले.
शिवजयंती तिथीनुसारच साजरी करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. दसरा-दिवाळीचे सण आपण तिथीनुसार साजरे करतो. त्याच धर्तीवर शिवाजी महाराजांचा जन्म हा आपल्यासाठी सण असल्याने तिथीनुसारच तो साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी मिरवणुकीत शिवाजी महाराजांचा वेश कोणालाही परिधान करून देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे आपणच आपल्या राजांचे विडंबन करीत असल्याचा संदेश जातो. त्यामुळे अशा प्रकारे विडंबन थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले.
- या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी खास शिवजयंतीसाठी तयार केलेल्या पक्षाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केले. हा ध्वज लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर वाटणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने तो घरी, शाखेत आणि गाडीवर लावून शिवजयंती जोरदार साजरी करावी, असे राज ठाकरे यांनी सांगितले. या ध्वजावर शिवमुद्रेचे चित्र आहे.