"भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 06:06 PM2024-02-13T18:06:47+5:302024-02-13T18:07:24+5:30

भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या!" अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

If you are getting stomach ache after seeing BJP's horse race Take a worm pill Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray | "भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

"भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर...; एक जंताची गोळी घ्या!" आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप, आज काँग्रेसव्याप्त होत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सोमवारी आयोजित केलेल्या जनसंवाद मेळव्यात केली होती. एवढेच नाही, तर भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल, असे भाकीतही त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता, "त्या श्रीमान उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये. भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या!" अशा शब्दात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेला यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

एक जंताची गोळी घ्या! -
शेलार यांनी सोशल मीडिया 'X' वर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "मूळ शिवसैनिक नसलेल्या बाहेरून आलेल्या संजय राऊत यांना घेऊन ज्यांनी आपल्या पक्षाचे "राष्ट्रवादी" केले. उलटे सूर्य नमस्कार घालणाऱ्या भास्कर जाधव यांना घेऊन पक्षाच्या दुर्दैवाचे दशावतार केले. बाहेरून आलेल्या सुषमा अंधारेंना घेऊन आपल्या पक्षाची "समाजवादी सेना" केली. बाहेरून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना घेऊन आपल्या पक्षाला "पेज थ्री" केले. बाहेरून आलेल्या आदेश बांदेकर यांना घेऊन आपल्या पक्षाचा "होम मिनिस्टर शो" केला. त्या श्रीमान उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे काय होईल, आमचे अध्यक्ष कोण होईल याची चिंता करु नये... भाजपाची घोडदौड पाहून पोटदुखी होत असेल तर राज्यात शासनातर्फे जंत विरोधी मोहीम आहेच. एक जंताची गोळी घ्या! जंतापासून मुक्त, सशक्त राजकीय भविष्य?" असे शेलार यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे -
उद्धव ठाकरे म्हणाले होते, "केंद्रातील भाजप सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत असल्याने, देशातील विरोधी पक्षांना फोडण्याचे काम मोदी शहा करीत आहेत. कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे व ते भाजपच्या संपर्कात असल्याचे ऐकायला मिळत आहे. यामुळे कधीकाळी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केलेला भाजप पक्ष आज काँग्रेसव्याप्त होत आहे." एवढेच नाही, तर, "भविष्यात भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेलाच असेल," असे भाकीतही उद्धव ठाकरे यांनी करून टाकले होते.

शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिला, आता काँग्रेसही देणार का? -
यावेळी, निवडणूक आयोगाने शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चोरांच्या हातात दिला. आता अशोक चव्हाणांच्या निमित्ताने काँग्रेसही देणार का? असा जाहीर सवालही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला. तसेच, "देशात सगळीकडे एकाधिकारशाही दिसून येत असून दहा वर्षात भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनांची पूर्ती केली नाही. भाववाढ, महागाईने जनता त्रस्त आहे, मात्र केंद्रातले सरकार स्वार्थी वृत्तीने विरोधी पक्षांना फोडण्यात गुंग आहे. भाजपाने मतांचा बाजार लावला असून विरोधी पक्षाच्या फोडाफोडीने स्व: पक्षातील निष्ठावंतावर अन्याय होत आहे, हे देखील भाजप विसरत आहे. तसेच या निर्दयी सरकारला देशातील शेतकरी व त्यांच्या आत्महत्यांकडे पहायला वेळ नाही, शेतीमालाचे भाव सातत्याने घसरत असून बळीराजा कर्जबाजारी होत आहे. मोदी सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण देशात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करावी," असे आव्हानही ठाकरे यांनी केंद्रातील सरकारला केले होते.


 

Web Title: If you are getting stomach ache after seeing BJP's horse race Take a worm pill Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.