तुम्ही पाणी तोडा, आम्ही दूध-भाजी बंद करतो

By Admin | Published: April 27, 2017 02:05 AM2017-04-27T02:05:26+5:302017-04-27T02:05:26+5:30

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली

If you break the water, we close the milk and vegetables | तुम्ही पाणी तोडा, आम्ही दूध-भाजी बंद करतो

तुम्ही पाणी तोडा, आम्ही दूध-भाजी बंद करतो

googlenewsNext

शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला विरोध करण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली, बुधवारी शहापूरजवळील चेरपोली येथे रास्तारोको करण्यात आले. यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. ‘तुम्ही मुंबईचे पाणी तोडा, आम्ही भाजीपाला-दूध बंद करतो,’ अशी चिथावणीखोर भाषा सरकारमध्ये सामील असलेल्या खासदार शेट्टी यांनी या वेळी केली.
जमीन बचाव संघर्ष समितीचे विश्वनाथ पाटील, आमदार पांडुरंग बरोरा, माजी खासदार सुरेश टावरे, आनंद ठाकूर, गोटीराम पवार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी ‘रास्तारोको’ आंदोलनात सहभाग घेतला. नेत्यांची भाषणे झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. यापुढील आंदोलन हे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक केले जाईल, असे शेट्टी यांनी जाहीर केले.
आंदोलनाच्या ठिकाणापासून ५०० मीटर अंतरावर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवली होती. खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात सहभागी शेतकरी ‘जमीन आपल्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘ये तो अंगडाई है,आगे तो लढाई है’ अशा घोषणा देत होते. शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. या महामार्गाकरिता ६० एकर जमीन संपादित करून, राज्य सरकार ठेकेदार आणि दलालांची समृद्धी करायला निघाले आहे. जी मंडळी सरकारमध्ये बसली आहेत, ती शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यांनी जमीन संपादनाकरिता शेतकऱ्यांविरोधात पोलिसी बळाचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले. आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असे सांगताना खा. शेट्टी म्हणाले की, सरकारच्या खिशात दमडी नसताना, हे समृद्धी महामार्ग बनवायला निघाले आहेत. पक्षीय राजकारण विसरून सर्वांनी एकत्र येऊन या प्रकल्पाला विरोध करायला हवा. स्वाभिमान संघटनेची संपूर्ण फौज शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शहापूरच्या शेतकऱ्यांनो, तुम्ही मुंबईचे पाणी तोडा, आम्ही दूध,भाजीपाला बंद करतो, मग बघा, सरकार कसे वठणीवर येते, असा इशारा त्यांनी दिला. आजचे आंदोलन फक्त सरकारला इशारा देण्यासाठी होते, यापुढे शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा पद्धतीने सरकार बेसावध असताना आंदोलन करू, असे शेट्टी म्हणाले.
महाराष्ट्राच्या १० जिल्ह्यांमधील ३५० गावे या महामार्गामुळे बाधित होणार असल्याचा दावा संघर्ष समितीचे निमंत्रक विश्वनाथ पाटील यांनी केला. महामार्ग पूर्ण करण्यासाठी पोलिसी बळाचा वापर करून, कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांचा बालहट्ट पूर्ण करण्याकरिता हा महामार्ग उभारण्यात येत असल्याचा आरोप आमदार पांडुरंग बरोरा यांनी केला.
या आंदोलनात शहापूर, कल्याण, भिवंडी तालुका संघर्ष समिती, किसान सभा, तसेच नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर परिसरांतील संघर्ष समितीचे पदाधिकारी, शेतकरी कामगार पक्ष आदींचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
‘समृद्धी’च्या विरोधात सेना-शेट्टी एकत्र!
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी जमिनी गमवाव्या लागत असलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात आम्हाला साथ द्या, अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून केली. मातोश्रीवरीलया भेटीत सहकार्य करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले, अशी माहिती खा. शेट्टी यांनी लोकमतला दिली.
शेतकरी, आदिवासींना महामार्गासाठी भूमिहीन केले जात असल्याच्या मुद्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. शेट्टी म्हणाले, आंदोलन तसेच शेतकरी कर्जमुक्ती, तूर खरेदीसंदर्भात शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. केंद्र व राज्य सरकारला शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रसंगी सरकारविरुद्ध एकत्र भूमिका घेण्याचे ठरले, अशी माहिती खा.शेट्टी यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: If you break the water, we close the milk and vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.