भाजपा सेनेसोबत युती केली तर एबी फॉर्म रद्द करू
By admin | Published: January 26, 2017 02:37 AM2017-01-26T02:37:43+5:302017-01-26T02:37:43+5:30
जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजपा शिवसेनेशी युती करणार नाही, पण स्थानिक पातळीवर जर कोणी युती केली
मुंबई : जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष भाजपा शिवसेनेशी युती करणार नाही, पण स्थानिक पातळीवर जर कोणी युती केली, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा निर्णय पक्षाने घेतल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बुधवारी मुंबईत बैठक झाली. तटकरे म्हणाले, जातीयवादी पक्षांच्या विरोधात हा निर्णय आम्ही घेतला असून, काँग्रेसनेही त्याचे पालन करेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस शिवसेनेसोबत हातमिळवणी करत आहे, तुम्ही काय करणार, असे विचारले असता, तटकरे म्हणाले, आम्ही आमचा निर्णय जाहीर केला आहे. एवढेच नाही, तर एबी फॉर्म दिल्यानंतर जर कोणी अशी युती केली, तर सदर एबी फॉर्म रद्द समजावा, असे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पक्षातर्फे पाठवले जाईल. एवढी कठोर भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षासोबत कोण हातमिळवणी करत आहे हे देखील राज्यातल्या जनतेला कळेल असेही तटकरे म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी भाजपाला मदत करत आहे, असे विधान केले आहे, त्याबद्दल काय? असे विचारले असता, चव्हाण यांच्याच कामगिरीमुळे आज दोन्ही काँग्रेसवर ही वेळ आली आहे. त्या वेळी त्यांनी केलेली खेळी भाजपाच्या फायद्याची ठरली, हे सगळ्यांना माहिती आहे. ते एक व्यक्ती आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी जर तशी भूमिका घेतली, तर आम्ही त्यावर पक्ष म्हणून आमची भूमिका मांडू. अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची जाहीर भूमिका घेतली आहे, असेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)