सत्तेवर आल्यास विद्यार्थ्यांना मोफत टॅब - उद्धव ठाकरे
By admin | Published: September 4, 2014 12:52 PM2014-09-04T12:52:22+5:302014-09-04T13:59:23+5:30
सत्तेवर आल्यास महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - राज ठाकरे यांच्या विकासाच्या ब्लू प्रिंटला मुहूर्त सापडला असतानाच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या व्हिजन डॉक्यूमेंटचा पुढचा टप्पा मांडून पुन्हा एकदा मनसेवर मात केली आहे. सत्तेवर आल्यास महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधील ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब दिला जाणार असून या टॅबमधील एसडी कार्डमध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम असेल असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
गुरुवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांनी व्हिजन डॉक्यूमेंटचा पुढील टप्पा मांडला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे रस्तेविषयक धोरण मांडले असून आज त्यांनी शिक्षणविषय धोरण मांडले. विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा फडकल्यास राज्यात शिक्षण क्षेत्रासाठी ई प्रबोधन ही योजना राबवू असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या योजनेनुसार सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब व एसडी कार्ड दिले जाईल. तर ग्रामीण भागांमधील शाळांमध्ये टीव्ही संच आणि ई प्रबोधन कीट दिला जाईल असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना देशातील क्रांतिकारकांची माहिती व्हावी यासाठी त्यांना वंदे मातरम् ही पुस्तिकाही देऊ असे त्यांनी नमूद केले.
फुकटची आश्वासने देणार नाही
अनेक राज्यांमध्ये मोफत टीव्ही, फ्रिज, लॅपटॉप देण्याची घोषणा केली. जाते पण आम्ही जनतेला फुकट काही देणार नाही. याऐवजी या गोष्टी विकत घेण्याची आर्थिक ताकद त्यांना उपलब्ध करुन देऊ असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच सरकारी तिजोरीतील पैशाचा वापर फक्त जनतेच्या कामासाठीच होईल असे आश्वासनही त्यांनी याप्रसंगी दिले.