"हिंमत असेल, तर दोन तासात...", प्रसाद लाडांचे मनोज जरांगेंना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:24 PM2024-09-12T13:24:06+5:302024-09-12T13:29:20+5:30
Prasad Lad Manoj jarange Patil : आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी मांडलेल्या भूमिकेवर बोट ठेवत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आता मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे. लाड यांनी जरांगेंना पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.
Manoj Jarange Prasad Lad Reservation : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेचे देशात पडसाद उमटले. राहुल गांधींच्या भूमिकेकडे बोट दाखवत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना घेरले. जरांगे पाटलांना काही सवाल करत आमदार लाड यांनी नवे आव्हान दिले आहे.
भारतातील आरक्षण संपवण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी 'सगळ्यांना समान संधी मिळायला लागतील, तेव्हा आरक्षण संपवण्याचा विचार करू. पण, तशी परिस्थिती नाही", असे उत्तर दिले. राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची भूमिका घेतल्याचे म्हणत भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. याच मुद्द्याचा आधार घेत प्रसाद लाडांनी मनोज जरांगेंना आव्हान दिले.
प्रसाद लाड मनोज जरांगे पाटलांना काय म्हणाले?
"आरक्षणाच्या बाबतीतील राहुल गांधींची विदेशात जी भूमिका आहे की, संविधान आम्ही संपवणार. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करण्याचे काम केले. आज खऱ्या अर्थाने काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून ही स्पष्टपणे, देशासमोर आणि जगासमोर आली", असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
"यामाध्यमातून राहुल गांधींना, तर प्रश्न आहेच; पण मनोज जरांगे पाटलांनादेखील माझा प्रश्न आहे. मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींना विचारणार आहेत का? महाविकास आघाडीचा बुरखा फाडणार आहेत का? का पुन्हा एकदा म ची बाधा टाकून महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहेत?", असे सवाल आमदार लाड यांनी जरांगे पाटलांना केले आहेत.
आमदार लाड मनोज जरांगेंना म्हणाले, 'हिंमत असेल, तर दोन तासात...'
याच मुद्द्यावर पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, "जर आरक्षण रद्द झाले, तर ज्या आरक्षणासाठी भाजप आणि महायुतीने संघर्ष केला. मराठ्यांना आरक्षण दिले. तेच आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधींच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार आहेत का?"
"ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले, तरीदेखील देवेंद्र फडणवीसांना शिव्या देणारे, फडणवीसांना शाप देणारे, मनोज जरांगे पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे. मनोजजी, हिंमत असेल, तर पुढच्या दोन तासांत पत्रकार परिषद घ्या. राहुल गांधींचा बुरखा फाडा, तर आम्ही समजू की, तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात. खरे मराठ्यांचे नेते आहात", असे आव्हान लाड यांनी जरांगे पाटलांना दिले.
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का?
— Prasad Lad (@PrasadLadInd) September 12, 2024
राहुल गांधी येणाऱ्या काळात आरक्षण संपवणार असतील, तर मनोज जरांगे पाटील हे म्हणतील का? की राहुल गांधी देखील मा. देवेंद्र फडणवीस जींचा माणूस आहे?
लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी… pic.twitter.com/kNYHKIxhXS
"तुमचे बेगडी प्रेम आणि मराठ्यांना फसवण्याचे तुमचे उद्दिष्ट, जनतेसमोर येईल आणि तुमचा चेहरा फाटेल. जर तुमचा बुरखा फाडायचा नसेल, तर राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेऊन तुम्हाला त्यांचा बुरखा फाडावा लागेल. हेच आज मी राज्यातील जनतेला, माझ्या मराठा बांधवांना आणि राज्यातील मराठी जनतेला सांगू इच्छितो", अशी टीका लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली.