असेल हिंमत तर करा चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 03:24 AM2017-02-17T03:24:26+5:302017-02-17T03:24:26+5:30
केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी
मुंबई : केंद्रात आणि राज्यातही भाजपाचे सरकार आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे आव्हान शिवसेनेने भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
भाजपा खासदार किरीट सोमय्या वारंवार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना संपत्ती घोषित करण्याचे आव्हान दिले होते. यासंदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका मांडली. ‘किरीट सोमय्या हे आजवर कॉपोर्रेट कंपन्यांना ब्लॅकमेल करत आले आहेत. त्यांनी खुद्द नितीन गडकरींनाही अशाच पद्धतीने ब्लॅकमेल केले होते. पूर्ती घोटाळा त्यांनीच उघड केला; पण पुढे या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोटे आरोप करायची सोमय्यांची रीत आहे, अशी टीका शेवाळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाकडे कुठलीही बोगस कंपनी किंवा बेहिशेबी संपत्ती नाही हे मी जबाबदारीने सांगतो. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. हवेत आरोप करून ठाकरेंना बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नका. वैयक्तिक आरोप करून मुख्यमंत्र्यांनी पराभव स्वीकारल्याचं स्पष्ट आहे, असे शेवाळे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत हतबल आणि अज्ञानी मुख्यमंत्री आहेत. त्यांना स्वत:च्या अधिकारांची आणि कारभाराची जाण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. (प्रतिनिधी)