'जमत नसेल तर वसंतदादा साखर कारखाना चालवायला द्या'

By Admin | Published: September 28, 2016 07:56 PM2016-09-28T19:56:29+5:302016-09-28T19:56:29+5:30

वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली.

If you do not have a joint venture 'Vasantdada sugar factory' | 'जमत नसेल तर वसंतदादा साखर कारखाना चालवायला द्या'

'जमत नसेल तर वसंतदादा साखर कारखाना चालवायला द्या'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

सांगली, दि. 28 - स्वत:च्या खासगी संस्था नफ्यात चालवत असाल आणि वसंतदादा कारखान्यावर वर्षाला कोट्यवधीचा तोटाच लादणार असाल, तर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास द्या, अशी मागणी संतप्त सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडे बुधवारी केली. वर्षभर बिले मिळत नाहीत आणि विचारणा केल्यानंतर उत्तरेही व्यवस्थित दिली जात नाहीत, अशा तक्रारीही सभासदांनी मांडल्या. दरम्यान, अध्यक्ष विशाल पाटील यांनी, यंदा उसाला प्रतिटन २५०० रुपये देण्याचा मानस असल्याचे जाहीर केले.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. सभेला कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून हजारो सभासद उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीसच कवठेपिरान (ता. मिरज) येथील चंद्रशेखर बुटाले म्हणाले की, प्रत्येक सभेत कारखाना व्यवस्थित चालविला जात नसल्याबद्दल आम्ही तक्रारी करतो. वसंतदादा घराण्यावर विश्वास ठेवून सभासद ऊस घालत आहेत. परंतु, कारखाना प्रशासन आणि संचालक मंडळाने सभासदांची निराशा केली आहे. वेळेवर बिले मिळत नाहीत. दिलेले धनादेशही वठत नाहीत. तुम्हाला कारखाना व्यवस्थित चालविताच येत नसेल, तर तो अन्य संस्थांकडे चालविण्यास द्या.
अंकलखोप (ता. पलूस) येथील अनिल पाटील म्हणाले की, वर्षाला कारखान्याचा तोटा वाढवून सभासदांची फसवणूक करण्यापेक्षा तो चालवायला द्या.
त्यांच्या सुरात अन्य सभासदांनीही सूर मिसळून, कारखान्याच्या तोट्याबाबत आणि ऊस उत्पादकांच्या बिलाबाबत कारखाना संचालक व प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली.
सभासदांच्या संतप्त भावनांवर संचालक मंडळाची बाजू मांडताना विशाल पाटील म्हणाले की, दालमिया आणि रेणुका शुगर समूहाशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी मी दोनवेळा चर्चाही केली आहे. कारखाना चालवायला देण्याची सभासदांची इच्छा असेल, तर माझा त्यामध्ये कोणताच अडथळा असणार नाही. परंतु, वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. कारखान्यावर कर्जाचा बोजा आजचा नसून पूर्वीपासूनचा आहे. २७० कोटीच्या कर्जाचे व्याज वीस ते पंचवीस कोटी होत असल्यामुळे, तोटा वाढतच आहे. यात आताच्या संचालक मंडळाचा काहीच दोष नाही.
ते म्हणाले की, यंदा गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटन २५०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागणार आहे. उसाची कमतरता आणि साखरेचे वाढलेले दर यामुळे ते शक्य होईल. या हंगामामध्ये कारखाना एन.पी.ए.मधून बाहेर पडल्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा सुरळीत होईल.
यामुळे येत्या गळीत हंगामात बिल देण्यासाठी काहीच अडचण निर्माण होणार नाही. उसाचे गाळप झाल्यानंतर आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.
त्यानंतर दिनकर पाटील-साळुंखे यांनी थकीत बिलांची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी केली.
सभेत हणमंतराव पाटील, बबन गावडे, महादेव मोहिते, बाळासाहेब चौगुले, अण्णासाहेब पाटील, अमरनाथ पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, विठ्ठल शिंदे, प्रदीप शिंदे यांनी संचालक मंडळाला थकीत बिलाबाबत जाब विचारला. १३ नोव्हेंबरपासून वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष कारखान्याने साजरे करावे, अशी मागणी सदस्यांनी केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक वारंवार बदलू नका, असेही सुनावण्यात आले.

थकीत बिले दोन दिवसात देणार
ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी थकीत ऊस बिलांची जोरदार मागणी केली. ऊस उत्पादकांना १० आॅक्टोबरपर्यंत बिले मिळाली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील यांनी सांगितले. मात्र ऊस उत्पादकांची जुनी थकीत बिले येत्या दोन दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन विशाल पाटील यांनी दिले. त्यावर हे आश्वासन तरी अध्यक्षांनी पाळावे, अशी खोचक टीका सभासदांनी केली.

सभासदांचे प्रश्न आणि अध्यक्षांची क्षमा
यापूर्वी सभासदांना साखर देण्याचे जाहीर केले असले तरी साखरच मिळालेली नाही. उसाची बिले दोन वर्षांपासून मिळत नाहीत. धनादेश दिले जातात, प्रत्यक्षात ते वटतच नाहीत. या समस्यांनी शेतकरी व सभासद हतबल झाला, तरी अध्यक्ष आणि प्रशासन गांभीर्याने दखल का घेत नाही, असा संतप्त सवाल सभासदांनी केला. सभासदांच्या प्रत्येक प्रश्नावर विशाल पाटील, ह्यतुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल मी क्षमा मागतोह्ण, असे सांगत होते. नंतर काही सभासदांनी प्रश्न विचारणे थांबवून सभाच बंद करा, असे सुनावले आणि ते उठूनही गेले.

Web Title: If you do not have a joint venture 'Vasantdada sugar factory'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.