उपाययोजना न केल्यास जनभावना भडकेल
By admin | Published: September 6, 2015 12:51 AM2015-09-06T00:51:16+5:302015-09-06T00:51:16+5:30
राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून
पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला.
दुष्काळाबाबत योग्य ती माहितीच शासनाकडे नसल्याचा आरोप करीत मुख्यमंत्र्यांना सत्तेचे गांभीर्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर शनिवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, शासनाने रोजगार हमीअंतर्गत कामे सुरूकेली पाहिजेत़ अनेक पाणी योजना, वीजबिलाची थकबाकी असल्याने त्या बंद पडल्या आहेत़ ही वसुली स्थगित करून त्यांना वीजपुरवठा सुरू केला पाहिजे़ ग्रामीण भागातील करच माफ करावेत, पण सध्या किमान स्थगिती तरी दिली पाहिजे. दुष्काळी परिस्थितीचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. केवळ फीमाफी करून चालणार नाही, तर त्यांच्या राहण्या-जेवण्याचीही व्यवस्था करण्याची गरज आहे. हे अधिकार जिल्हाधिकारी - तहसीलदार स्तरापर्यंत मिळाले तर कार्यवाही सोपी होईल.
सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप करताना पवार यांनी चारा छावण्यांबाबत काढलेल्या अधिसूचनेचा दाखला दिला़ ते म्हणाले, की शासनाने फक्त बीड, लातूर आणि उस्मानाबाद येथे छावण्या सुरू करण्याचे परिपत्रक काढले.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थितीची कल्पना दिली. एक महिना वाट पाहू़ आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही. मात्र काहीच निर्णय घेतला नाही तर संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जनावरांसह आंदोलन हाती घ्यावे लागेल़ ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना आलेल्या धमकीपत्राविषयी ते म्हणाले, की कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेण्याच्या वृत्तीमुळे राज्यातील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे़ केंद्र आणि राज्यात सत्तांतरानंतर अशा प्रवृत्तीचा आत्मविश्वास वाढला असल्याची टीका त्यांनी केली़ (प्रतिनिधी)
राज ठाकरेंकडे दूरदृष्टी
राज ठाकरे यांच्या टीकेला पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, की राज ठाकरे हे अत्यंत दूरदर्शी आणि जनतेची अखंड सेवा करणारे नेतृत्व आहे. उद्या भूकंप झाला तरी त्याला ते राष्ट्रवादीला जबाबदार धरतील, असे ते म्हणाले.
सरकार-संघात फरक नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला हजेरी लावल्याबद्दल ते म्हणाले, की सरकार आणि संघ यात आपण फरक मानत नाही़ ते सरकारचाच एक भाग आहे. बिहार निवडणुकीत मुलायमसिंह यादव यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी २२ सप्टेंबरला दिल्लीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे बैठक आहे़ त्यात काय ते ठरेल, असे त्यांनी सांगितले.
चारा छावण्यांचा पेच
आजपर्यंत सहकारी साखर कारखाने आणि विविध संस्था चारा छावण्या उभारत होत्या. मात्र या वर्षी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चारा छावण्या उभारू नयेत, सरकारनेच या छावण्या चालवाव्यात, असे सांगत शरद पवार यांनी सरकारला पेचात पकडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पूर्वी चारा कोणी खाल्ला, असा सवाल करून हेतूबद्दल शंका घेतली होती. शंकेला जागा नको, सरकारला छावण्या उभारण्यासाठी कार्यकर्ते मदत करतील; परंतु स्वत: उभारणार नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.