काँग्रेस संपवायची नसेल तर राष्ट्रवादीचे जोखड झुगारा
By admin | Published: September 1, 2014 02:10 AM2014-09-01T02:10:05+5:302014-09-01T02:10:05+5:30
गेल्या दहा वर्षांत आमच्या मतदारसंघांमध्ये पंजा नाही. घड्याळ्याच्या वर्चस्वाखाली आम्हाला राजकारण करावे लागते. राष्ट्रवादीचे जोखड एकदाचे झुगारा.
मुंबई : गेल्या दहा वर्षांत आमच्या मतदारसंघांमध्ये पंजा नाही. घड्याळ्याच्या वर्चस्वाखाली आम्हाला राजकारण करावे लागते. राष्ट्रवादीचे जोखड एकदाचे झुगारा. आम्हाला लढण्याची संधी द्या, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या कोट्यातील मतदारसंघांसाठी मुलाखतींकरता आलेल्या काँग्रेसच्या इच्छुकांनी रविवारी पक्षाच्या निवड मंडळाला केली.
२००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या ११४ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती दिवसभर टिळक भवनात झाल्या. यावेळी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह होता. विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री आर.आर.पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री अशा राष्ट्रवादीच्या बहुतेक दिग्गजांच्या मतदारसंघांत उमेदवारी मागणारे काँग्रेसजन मोठ्या संख्येने आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांच्या पुसद मतदारसंघासाठी मात्र काँग्रेसचा कोणीही दावेदार नव्हता. राष्ट्रवादीची दादागिरी खूप झाली. त्यांचे आमदार असल्याने सगळ्या कमिट्यांवर त्यांचेच कार्यकर्ते घेतले जातात. महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो. आमचे सरपंच, नगरसेवक विकासासाठी आमदारांकडे निधी मागायला गेले की हाकलून लावतात. हा अपमान किती दिवस सहन करायचा, अशी तीव्र भावना सिंदखेडराजा, मेहकर, देवळाली, जळगाव, मूूर्तिजापूर, औरंगाबाद ग्रामीण, इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ, विक्रोळी, कुर्लासह बहुतेक मतदारसंघांतून आलेल्या इच्छुकांनी निवड मंडळासमोर मांडली. इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांनी टिळक भवनात उभारलेल्या मंडपात हीच भूमिका पत्रकारांसमोर मांडली. (विशेष प्रतिनिधी)