चुकीची कामे कराल तर निधी नाही
By admin | Published: May 5, 2017 04:02 AM2017-05-05T04:02:57+5:302017-05-05T04:03:06+5:30
कंत्राटदारधार्जिणी कामे करून निधीची लयलूट करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चुकीची कामे करणाऱ्या नगरपालिकांना निधीच
मुंबई : नगरपालिकांमध्ये कंत्राटदारधार्जिणी कामे करून निधीची लयलूट करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चुकीची कामे करणाऱ्या नगरपालिकांना निधीच दिला जाणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
पहिल्या नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगरपरिषदा, सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा, तसेच महापालिकांच्या विशेष पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, चांगली कामगिरी करणाऱ्या नगरपालिकांचा सत्कार केला जाईल. मात्र, चुकीचे काम करणाऱ्यांच्या निधीवर नक्कीच संक्रांत येईल. सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीतील मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. या माध्यमातून शंभर टक्के मालमत्तांना करांच्या कक्षेत आणले जाईल. यामुळे शहरांना विकासासाठी अधिकचा निधी उपलब्ध होऊ शकेल. सध्या जवळपास ४० टक्के मालमत्ता या करकक्षेबाहेर आहेत. त्यांना करकक्षेत आणल्यानंतर कर कमीही करता येऊ शकेल.
विविध शहरांचे १४६ प्रकल्प आठ वर्षांपासून प्रलंबित होते. हे प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत ४६ प्रकल्पांसाठी गेल्या वर्षी तीन हजार कोटी रुपये, या वर्षी ५० प्रकल्पांसाठी तीन हजार कोटी दिले आहेत. नगरपालिका प्रशासनासाठी एक उत्कृष्ट असे वेबपोर्टल तयार करण्यात येणार असून त्याद्वारे सर्व नगरपालिका प्रशासकीय कामकाज सुलभरीत्या करू शकतील, सेवा हमी कायद्यांतर्गतच्या विविध सेवा या वेबपोर्टलवर अर्ज करून प्राप्त करता येतील. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर यांनी नगरपालिका प्रशासनात चांगले काम केले आहे, असेही गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
या कार्यक्रमास गृह (शहरे) तसेच नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास-२ विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर- म्हैसकर, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक वीरेंद्र सिंग उपस्थित होते. प्रास्ताविक मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी केले. आभार विरेंद्र सिंह यांनी मानले. (विशेष प्रतिनिधी)
विभाग आणि पुरस्कारार्थी नगरपालिका अशा
अ वर्ग नगरपालिका : नागपूर व अमरावती विभाग : वर्धा, जि. वर्धा; नाशिक व औरंगाबाद विभाग : उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद; कोकण व पुणे विभाग : अंबरनाथ, जि. ठाणे.
ब वर्ग नगरपालिका : नागपूर विभाग : प्रथम क्रमांक - उमरेड, जि. नागपूर; द्वितीय क्रमांक - बल्लारपूर, जि. चंद्रपूर; अमरावती विभाग : प्रथम क्रमांक - वाशिम, जि. वाशिम; द्वितीय क्रमांक - उमरखेड, जि. यवतमाळ; औरंगाबाद विभाग : प्रथम क्रमांक - हिंगोली, जि. हिंगोली; द्वितीय क्रमांक - वैजापूर, जि. औरंगाबाद; नाशिक विभाग : प्रथम क्रमांक - शिरपूर वरवाडे, जि. धुळे; द्वितीय क्रमांक - संगमनेर, जि. अहमदनगर; कोकण विभाग : प्रथम क्रमांक - खोपोली, जि. रायगड; द्वितीय क्रमांक - रत्नागिरी, जि. रत्नागिरी आणि चिपळूण, जि. रत्नागिरी यांना विभागून; पुणे विभाग : प्रथम क्रमांक - पंढरपूर, जि. सोलापूर; द्वितीय क्रमांक : विटा, जि. सांगली.
क वर्ग नगरपालिका : नागपूर विभाग : प्रथम क्रमांक - मौदा नगरपंचायत, जि. नागपूर; द्वितीय क्रमांक : खापा, जि. नागपूर; अमरावती विभाग : प्रथम क्रमांक - शेंदूरजनघाट, जि. अमरावती; द्वितीय क्रमांक : दारव्हा, जि. यवतमाळ आणि पांढरकवडा, जि. यवतमाळ यांना विभागून; औरंगाबाद विभाग : प्रथम क्रमांक - तुळजापूर, जि. उस्मानाबाद; द्वितीय क्रमांक : पाथरी, जि. परभणी; नाशिक विभाग : प्रथम क्रमांक - त्र्यंबक, जि. नाशिक; द्वितीय क्रमांक : देवळाली प्रवरा, जि. अहमदनगर; कोकण विभाग : प्रथम क्रमांक - वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग; द्वितीय क्रमांक : मालवण, जि. सिंधुदुर्ग; पुणे विभाग : प्रथम क्रमांक - पाचगणी, जि. सातारा; द्वितीय क्रमांक : आष्टा, जि. सांगली.
यापैकी सर्वोत्कृष्ट नगरपालिका म्हणून पुढील नगरपालिकांची निवड करण्यात आली तसेच त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अ वर्ग : अंबरनाथ, जि. ठाणे ब वर्ग : उमरेड, जि. नागपूर तसेच शिरपूर वरवाडे. क वर्ग : वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग. तसेच विविध विभागांत उत्कृष्ट काम केलेल्या महानगरपालिकांना विशेष पुरस्कारही या वेळी देण्यात आले. नवी मुंबई : सर्वाधिक वसुली व कचरा वर्गीकरणामध्ये सर्वोत्तम कामगिरी, ठाणे : सर्वाधिक वसुली, धुळे : सर्वाधिक वसुली, अकोला : उत्पन्नवाढीसाठी विशेष प्रयत्न, पुणे : हागणदारीमुक्ती कार्यक्रम अत्युत्कृष्ट कामगिरी, मीरा-भार्इंदर : प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कामगिरी, नागपूर : प्रकल्प व्यवस्थापनामध्ये सर्वोत्तम कामगिरी.
कार्यक्रमात उत्कृष्ट अ वर्ग नगरपरिषदांना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा पुरस्कार, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. उत्कृष्ट ब वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार तीन कोटी रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि उत्कृष्ट क वर्ग नगरपरिषदेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा, तर द्वितीय पुरस्कार दोन कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले.