लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 08:03 IST2025-03-30T08:02:51+5:302025-03-30T08:03:44+5:30

Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. 

If you don't get married, then whose children are they? Court questions Dhananjay Munde's claim | लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

मुंबई - करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला. 

करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिले आहे, तर पोटगीची रक्कम वाढविण्यासाठी करुणा यांनीही सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

या अर्जांवरील सुनावणीत धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अधिकृत विवाह झाला नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या वकिलांना त्या दोघांचे लग्न झाले, याचे पुरावे मागितले. शर्मा यांच्या वकिलांनी पुरावे सादर करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी ठेवली. 

न्यायालयात काय घडले?
मुंडे यांचे वकील :
करुणा शर्मा यांच्याशी धनंजय मुंडे यांनी अधिकृतपणे विवाह केला नाही.
न्यायाधीश : मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचे आई- वडील कोण? 
मुंडे यांचे वकील : मुंडे यांनी मुलांना स्वीकारले आहे; पण त्यांच्या आईशी लग्न केलेले नाही.
न्यायाधीश : मुले जर तुमची आहेत, तर करुणा शर्मा त्यांच्या आई कशा नाहीत? 
मुंडे यांचे वकील : दोन्ही मुलांना मुंडे यांनी स्वीकारले आहे आणि त्यांना आपले नाव दिले. करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालविला, याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत. त्यांच्यात पती- पत्नीसारखे संबंध नव्हते आणि दोघांचा अधिकृत विवाह झाला नाही. राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. धनंजय मुंडे यांचा एक विवाह झालेला आहे. त्यामुळे दुसरा विवाह त्यांनी केला नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यात परस्पर संमतीने संबंध होते. त्यांनी ते लपविले नाहीत; पण करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला नाही. विवाह केला नाही, तर पोटगी कशी देणार? 
मुंडे यांचे वकील :  करुणा शर्मा यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाख रुपयांच्या आसपास आहे. त्या आयकर भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. तरीही त्या पोटगी मागतात.

करुणा शर्मा यांच्या वकिलांचा युक्तिवाद
धनंजय मुंडे यांनी १९९८ मध्ये करुणा शर्मा यांच्याशी विवाह केला. त्यांचा एकत्र फोटोही आहे. या लग्नातून त्यांना दोन मुले आहेत.
न्यायाधीश : धनंजय मुंडे यांच्याशी करुणा मुंडे यांचा विवाह झाला, याचे काय पुरावे आहेत? 
शर्मा यांचे वकील : आमच्याकडे पुरावे आहेत. पुरावे सादर करण्यासाठी वेळ द्या. आम्ही पुढील सुनावणीमध्ये पुरावे सादर करू.

Web Title: If you don't get married, then whose children are they? Court questions Dhananjay Munde's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.