आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा,राज ठाकरे यांनी सुनावले; तरुणांची माथी भडकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 07:00 AM2021-08-21T07:00:07+5:302021-08-21T07:00:31+5:30
Raj Thackeray : निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
पुणे : “निवडणुकीसाठी जातीचे राजकारण केले जात आहे. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याची कल्पना आहे का? मराठा तरुणांचे मोर्चे आज का निघाले? मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा ना! उगाच माथी भडकवण्याचे काम करू नका,” या शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.
“गेली ७४ वर्षे आपण जातीपातीत खितपत पडलो आहोत.
अजूनही रस्ते, वीज पाणी देऊ असे म्हणत असाल तर काय कमावले? जातपात केवळ राज्यात नव्हे तर देशभरात आहे,” असे सांगत ठाकरे यांनी १९९९ च्या पूर्वीही जातीपाती होत्या, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष वाढला याचा पुनरुच्चार केला. निवडणुकीत वॉर्डनिहाय स्त्री व पुरुष आरक्षण असायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुणे दौऱ्याचा महापालिका निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवरायांचा मूळ विचार घेऊन पुढे का जात नाही?
एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ’छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांनी न होता शाहू-फुले-आंबेडकर यांनी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार घेऊन का पुढे जात नाही, असा सवाल ठाकरे यांनी राष्ट्रवादीसमोर उपस्थित केला.
बाबासाहेबांकडे ब्राह्मण म्हणून नव्हे, इतिहास संशोधक म्हणून जातो
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ब्राह्मण म्हणून नव्हे तर इतिहास संशोधक म्हणून जातो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. राजकारणासाठी एजंट नेमले गेले. त्यांच्याकडून हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित नियोजन होतं, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
‘पवारांनी मला मोजत बसू नये’
“महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. यात माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला.
‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का, हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला.
“मी काय वाचलंय हे मला माहिती आहे. उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नये. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी फटकारले.