सत्ता मिळाल्यास ४०० मोहल्ला क्लिनिक
By admin | Published: September 12, 2016 04:26 AM2016-09-12T04:26:39+5:302016-09-12T04:26:39+5:30
आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन गोवा भेटीवर असून त्यांनी झोपडपट्टीवासियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या
पणजी : आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन गोवा भेटीवर असून त्यांनी झोपडपट्टीवासियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवर आल्यास ४०० मोहल्ला क्लिनिक व ४० पॉलिक्लिनिक उघडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘आप’ सत्तेवर आल्यास प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे ४० पॉलिक्लिनिक आणि प्रत्येक मतदारसंघात आकारानुसार आठ ते दहा मोहल्ला क्लिनिक उघडली जातील, असे त्यांनी सांगितले. दिल्लीत मोहल्ला क्लिनिकचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न काही हितशत्रू करीत आहेत; परंतु अजून त्यात त्यांना यश आलेले नाही, असे जैन म्हणाले.
गोवा आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होईपर्यंत ‘आप’च्या आमदारांविरुद्ध पोलीस तक्रारी चालूच राहतील. पोलीस तक्रारी केल्या म्हणून काही सिद्ध होत नाही. या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असतानाच तक्रारी येऊ लागल्या आहेत. लैंगिक अत्याचारांसंबंधी पक्षाच्या नेत्यांवर होत असलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत ,असे जाहीर केले तर आपोआप तक्रारी आणि गुन्हे दाखल होण्याचेही थांबतील. दिल्लीतील निवडणुकीच्या आधीही असेच सत्र आरंभण्यात आले होते; मात्र नंतर ते प्रकार बंद झाले, असे ते म्हणाले.
पक्षात कितीही मोठा नेता असला तरी कोणत्याही प्रकरणात जे कोणी दोषी आढळले, त्यांच्यावर कारवाई केली आहे. केवळ आमच्याच पक्षाने अशी कठोर कारवाई केली आहे. आमच्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस राजकारणात आला आहे. आजवर राजकारण्यांचीच मुले किंवा समाजकंटक राजकारणात यायचे; पण आता परिस्थिती बदलली आहे. काहींना हे सहन होत नाही, अशी टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)