हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 04:56 PM2024-01-29T16:56:36+5:302024-01-29T16:57:23+5:30
आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला.
पुणे - एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्याचे नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांचे ऐकावं असं ते नेते नाहीत. ते घटनाबाह्य पद्धतीने पदावर बसलेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर बेकायदेशीर बसले आहेत. शिंदे स्वत:ला नेते साध्य करण्यासाठी कधी काय निर्णय करतील हे मला सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या मराठा आंदोलनाला मॅनेज करण्याची क्षमता नाही. हा अंतर्गत राजकारणाचा घोटाळा आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
पुण्यात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली त्यात संजय राऊत म्हणाले की, जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते. सरकार ती भूमिका मांडताना त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो सरकारविरोधात बंड करतोय. अशावेळी मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करू शकतात. पण ज्याअर्थी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतायेत, मुख्यमंत्री वेगळे बोलतायेत. छगन भुजबळ वेगळे मांडतायेत. याचा अर्थ सरकारच्या मंत्रिमंडळात बेबनाव आहे. म्हणून मुख्यमंत्री खरोखरच सक्षम असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना मी बडतर्फ करतोय अशी शिफारस राज्यपालांना केली पाहिजे. हिंमत असेल तर ते नेते असं खुलं चॅलेंज राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे.
तसेच तू ओबीसींची भूमिका घे, मी मराठ्यांची भूमिका मांडतो. दोघांना मुर्ख बनवतो असं सत्ताधाऱ्यांचे असू शकते. कुरघोडी करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणतोय. परंतु या सरकारमध्ये हिंमत नाही. जनतेच्या मनात काय हे समजायचे असेल तर निवडणूक घ्या. १४ महापालिका निवडणूक रखडल्या आहेत. न्यायव्यवस्था तुमची गुलाम आहे. तुम्ही आता निवडणूक घ्या. आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला.
दरम्यान, ज्यादिवशी देशातील जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल तेव्हा भाजपा हरेल. भाजपा जिंकत नाही तर मशिन जिंकते. अलीकडच्या काळात मध्य प्रदेशात जे निकाल लागले ते लागूच शकत नव्हते. काहीतरी गडबड आहे. EVM नसेल तर भाजपा ग्रामपंचायतही जिंकणार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे हा किडा काढणारे भाजपाचेच होते. काँग्रेस सरकार असताना सगळ्यात आधी किरिट सोमय्या पुढे आले. देशभरात EVM घोटाळ्याबाबत जागरुक करण्याचे काम भाजपाने आधी केले. घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तीच्या गुलाम बनून काम करणार असतील तर न्याय कशा मिळणार? देशातील लोकशाहीचे मालक गुजरातमधील दोन व्यापारी झालेत असा घणाघात संजय राऊत यांनी केला.