बिनबुडाचे आरोप कराल तर कोर्टात खेचू !
By admin | Published: October 6, 2014 12:00 AM2014-10-06T00:00:42+5:302014-10-06T00:05:21+5:30
बुलडाणा येथील जाहीर सभेत सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदींना इशारा.
बुलडाणा : सध्या काही पक्षाचे दिल्लीहून आयात केलेले नेते महाराष्ट्रात येवून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्राचे रहिवासी आहोत; पण पवार कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असाल पंतप्रधान, पण खोटे आरोप कराल, तर तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिला.
यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला व फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालत असलेला महाराष्ट्र, देशात एक नंबरचे राज्य असताना, महाराष्ट्राने मान खाली घालावी अशी राज्याची बदनामी सुरू आहे. महाराष्ट्र सर्वात मागे आहे, असे म्हणणार्यांनी जे स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. त्याची मुहूर्तमेढ याच महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी केली होती. त्याला पंधरा वर्षापूर्वी आर. आर. पाटील यांनी मूर्त स्वरूप दिले होते. देशाला रोजगार हमी योजना याच महाराष्ट्राने दिली. इको व्हिलेज योजना जयंत पाटील यांनी सुरू केली. माहिती नसेल तर माहीत करून घ्या, मात्र खोटे आरोप करू नका, असा सल्ला खा. सुळे यांनी दिला.
निवडणूका आहेत, आमच्या महाराष्ट्रात तुमचा सन्मान आहे. तुम्ही या, भाषण करा, आमचे चुकत असेल तर निश्चित आमच्यावर टीका करा. आम्हाला तेही मान्य आहे. मात्र यापूर्वीही शरद पवार यांच्यावर अनेकवेळा खोटे आरोप झाले. ट्रकभर पुरावे देतो, अशी गर्जना करणार्यांना त्यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. आता पुन्हा महाराष्ट्राला उल्लु बनवत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात सुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.