तुम्ही लंगोट लावून या, आम्हीच चितपट करणार
By admin | Published: September 10, 2016 01:18 AM2016-09-10T01:18:29+5:302016-09-10T01:18:29+5:30
अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु, बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे.
बारामती : अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु, बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळेच बारामतीचा चौफेर विकास करणे आम्हाला शक्य झाले. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकात ‘तुम्ही लंगोट लावून या अथवा बिनालंगोटचे या तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा विरोधकांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बारामती नगरपालिकेच्या एका कार्यक्रमात विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नगरपालिकेच्या प्रत्येक कामाकडे आपले लक्ष आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या नागरी वस्त्यांमध्ये विकास होण्यासाठी काळजी घेतली जात आहे, असे सांगितले.
आपली सत्ता नसली की काही मंडळी ‘माझे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. माझी या मंत्र्यांशी ओळख आहे. त्या मंत्र्यांशी ओळख आहे,’ अशा भूलथापा देतात. त्यांच्याकडे लक्ष न देता बारामतीकरांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील नगरसेवकांनीच सध्या बंड पुकारले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या नेत्यांनीदेखील कंबर कसली आहे. त्यांच्यावर टीका करताना पवार यांनी ‘तुम्ही लंगोट लावून या अथवा बिनलंगोटचे या. तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा पवार यांनी दिला.
याशिवाय बारामतीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे कडक शब्दांत समाचार घेतला. बारामतीची धनकवडी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा नगररचना खात्याने केल्याचा दावा पवार यांनी केला. (प्रतिनिधी)
>रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला विरोध नको
बारामती दक्षिण भारताला रेल्वेच्या माध्यमातून जोडण्यासाठी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्याच्या भूसंपादनासाठी विरोध न करता भविष्यातील विकास डोळ्यासमोर ठेवावा, असेही शेतकऱ्यांना सांगितले. आता विरोध झाला तर पुढच्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दळणवळणाची साधने वाढल्यावर बारामतीच्या व्यापारपेठेला अधिक महत्त्व येईल.