नायलॉन मांजा हातात दिसल्यास पडणार बेडी
By admin | Published: January 9, 2017 11:02 PM2017-01-09T23:02:11+5:302017-01-09T23:04:24+5:30
मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पतंग उडविणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार
Next
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 09 - मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पतंग उडविणा-यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शहरातून नायलॉन मांजा हद्दपार करण्यासाठी पोलीसांना धडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सोमवारी (दि.९) दिले.
पतंगबाजीचे शौर्य नायलॉन मांजामुळे पक्ष्यांसाठी क्रौर्य ठरू लागले आहे. नव्या वर्षात निसर्गाचा हा खरा दागिना अधिक सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींसह सर्वच स्तरावरुन होत आहे. पतंगबाजीसाठी नायलॉन मांजाचा होणारा वापर जसा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणारा आहे तसाच माणसांच्याही जीवावर बेतणारा आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी नायलॉन मांजाची विक्री व वापरावर काही दिवसांपुर्वी निर्बंधही जाहीर केले असतानाही चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची विक्री व वापर सर्रासपणे सुरूच असल्याने निर्बंध कागदापुरतेच मर्यादित राहिले की काय? अशी शंका घेतली जात होती. त्यामुळे दस्तूरखुद्द सिंघल यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून गुन्हे शाखेसह सर्वच पोलीस ठाण्यांना चोरट्या मार्गाने नायलॉन मांजा साठवणूक करणाºयांविरुध्द कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी देखील थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन सिंघल यांनी केले आहे. नियंत्रण कक्षाकडे येणाºया तक्रारी तातडीने संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्याच्या सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत.
कठोर कारवाई...
जे पुरवठादार शहरात चोरट्या मार्गाने विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा सोपवित आहे त्यांच्याविरुध्द धडक मोहिम पोलिसांनी संक्रातीच्या चार दिवस आगोदरच हाती घेतली आहे. त्याचप्रमाणे जे प्रौढ नायलॉन मांजाने पतंगबाजी करताना आढळून येतील त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे तसेच नायलॉन मांजा वापरणा-या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून पोलीसांकडून मुले-पालक दोघांचे प्रबोधन केले जाणार असल्याचे सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.