मागच्या बाकावर बसलो तर सगळ्यांचीच अडचण!

By admin | Published: July 22, 2016 05:47 AM2016-07-22T05:47:35+5:302016-07-22T05:47:35+5:30

‘भ्रष्टाचाराच्या बेछूट आरोपांमुळे मी पहिल्या बाकावरून चौथ्या रांगेतील बाकावर आलो, परंतु मला सत्तेची अजिबात हाव नाही.

If you sit at the back of the bench, then everyone's problem! | मागच्या बाकावर बसलो तर सगळ्यांचीच अडचण!

मागच्या बाकावर बसलो तर सगळ्यांचीच अडचण!

Next


मुंबई : ‘भ्रष्टाचाराच्या बेछूट आरोपांमुळे मी पहिल्या बाकावरून चौथ्या रांगेतील बाकावर आलो, परंतु मला सत्तेची अजिबात हाव नाही. मी मागच्या बाकावरच बसलो, तर ते सत्ताधारी आणि विरोधकांनाही परवडणारी नाही,’ असा गर्भित इशारा देत, ‘माझ्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं नाही,’ असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ठणकावून सांगितले. मात्र, खडसे यांचे भाषण सुरू होताच, त्यांना एक चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले.
विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या कलंकित मंत्र्यावरील चर्चेत सत्ताधारी पक्षाकडून खडसे यांनी विधानसभेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, ‘माझ्यावर आयुष्यात एक आरोप झाला नसताना १५ दिवसात हिंदुस्थानात बदनाम करून ठेवले. ४० वर्षातील राजकीय जीवन एका क्षणात उद्ध्वस्त केले. परंतु मी कुणाला घाबरणार नाही. पण दु:ख वाटते. राजकीय पक्षांनी आरोप केले असते तर चालले असते पण इथे गल्लीतील पुरावे नसतांना ते केले. आज माझ्यावर ही वेळ आली, उद्या ती तुमच्यावरही येऊ शकते, असे सांगत खडसे यांनी दाऊद फोन कॉल, गजानन पाटील याच्या ३० कोटींची लाच प्रकरण ते भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी झालेल्या सर्व आरोपांचे गुरुवारी खंडन केले. आधी दाऊदची पत्नी मेहजबीन, नंतर अंजली दमानिया, प्रीती मेमन अशा माझ्यावर आरोप करायला महिलाच मिळाल्यात का, माणसे नव्हती काय, असा सवालही त्यांनी केला.
शेतजमिनी व्यतिरिक्त दुसरे काही आढळल्यास मी राजकीय संन्यास घेईन, परंतु बेछूट आरोप करू नका. इथे सगळे नालायक, चोर-उचक्के बसलेत का सभागृहात काहीही आरोप करायला, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. खडसे यांच्या आजच्या भाषणात विरोधकांबरोबर स्वपक्षातील मंडळींनाही मार्मिक टोले होते. त्यामुळे खडसेंनी नेमका कोणावर निशाणा साधला, याचीच चर्चा विधिमंडळात होती.(प्रतिनिधी)
>आरोप पुराव्यानिशी करा
पुरावे नसलेले आरोप करून काही लोकांनी माझे, माझ्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण आरोप करायचे असतील, तर ते पुराव्यानिशी करा. मी विरोधी पक्षात असताना जे काही या सभागृहात बोललो, ते पुराव्यानिशी बोललो आहे.
मी पुरावे दिल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५२ प्रकरणांची चौकशी लावली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
>कोण हा भंगाळे? 
माझ्यावर दाऊदच्या पत्नीच्या फोनवर संभाषण केल्याचा आरोप मनीष भंगाळेमार्फत करण्यात आला. कोण हा भंगाळे? मी दाऊदच्या बायकोशी कशाला बोलू? दाऊदशी बोलल्याचा आरोप झाला असता, तर एक वेळ समजता आले असते, पण त्याची बायको माझ्याशी कशाला बोलेल?

Web Title: If you sit at the back of the bench, then everyone's problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.