पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची गय नाही; भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंडखोरांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 03:59 AM2019-12-14T03:59:00+5:302019-12-14T06:03:28+5:30
पक्ष विरोधी कारवाया, गटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.
सोलापूर : परळीमध्ये पंकजा मुंडे यांनी पक्षातील नेत्यांबाबत जे मतभेद मांडले ते चार भिंतींच्या आत मांडायला पाहिजे होते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे वातावरण कडक झाले आहे. पक्ष विरोधी कारवाया, गटबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही पाटील यांनी दिला.
सोलापूर शहराच्या नव्या महापौर आणि उपमहापौरांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, की, मी काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. परळीचे चित्र मनाला समाधान देणारे नव्हते, पण संवादाने काही गोष्टी जुळून येतात. मला अनेकांनी सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी जावू नका, तुमच्यावर हल्ला होईल. मी त्या ठिकाणी गेलो, कारण मतभेद असतात. संवादाने खूप गोष्टी सुटतात. मी गेलो. खूप संवाद झाला.
बावनकुळे यांनी केली फडणवीसांची पाठराखण
नागपूर : भाजपाचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचे पडसाद पक्षातीलच ओबीसी नेत्यांमध्ये उमटत असून त्यांच्या वक्तव्याबद्दल पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फडणवीस यांनी केवळ ओबीसी नेतेच नव्हे तर ओबीसी समाजाला देखील न्याय दिला, हे साºयांनाच ठाऊक असताना खडसे आणि पंकजाताई यांनी असे विधान करणे दुर्दैवी असल्याचे मत विदर्भातील ओबीसी नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजांच्या सहनशक्तीचा कडेलोट - महाजन
औरंगाबाद/पुणे : पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर घेतलेली भूमिका ही त्यांचा संयम संपल्याचे प्रतीक आहे. त्यांना भाजपमधील नेतृत्व करणाºयांकडून प्रचंड त्रास होत असेल. संयम संपल्यामुळे कडेलोट झाल्याचे मत त्यांचे मामा प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले.
च्महाजन म्हणाले, पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर ही परिस्थिती आणल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापासून सर्वांनाच मागील ४० वर्षांपासून ओळखत आहे. आतासारखी परिस्थिती कधीही नव्हती.
केंद्रीय नेतृत्व पक्षात काही घडत असेल तर तात्काळ लक्ष घालत असे. मात्र, आता तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढेल, असे प्रकाश महाजन म्हणाले. पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी ‘मंत्री होता, तेव्हा काय दिवे लावले,’असा सवाल मुंडे यांना केला, त्यावर पक्षाच्या आमदार व पुणे शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी ‘बाहेरचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही, असे सांगितले.