पक्षविरोधी कारवाया कराल तर गय करणार नाही; चंद्रकांत पाटलांचा खडसे-पंकजा मुंडेंना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 02:32 PM2019-12-13T14:32:21+5:302019-12-13T14:34:22+5:30
केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही
सोलापूर - गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत झालेल्या कार्यक्रमावेळी जाहीर व्यासपीठावरुन एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त पक्षातील नेतृत्वावर टीका केली. त्यामुळे भाजपातील अंतर्गत खदखद समोर आली आहे. मात्र या मेळाव्यानंतर सोलापूर येथील एका कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही असा सूचक इशारा एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. मला अनेकांनी सांगितलं तुम्ही त्याठिकाणी जावू नका, तुमच्यावर हल्ला होईल वैगेरे बोलले पण मी त्याठिकाणी गेलो कारण मतभेद असतात, संवादाने खूप गोष्टी सुटतात असं त्यांनी सांगितले.
तसेच पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावरुन बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, पण महाराजांनी बंड मोगलांविरोधात केलं होतं, सावरकरांनी इंग्रजांविरोधात बंड केलं होतं. स्वकीयांविरोधात बंड करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. घरातील भांडणं चव्हाट्यावर आणायची नसतात असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी मुंडे-खडसेंना दिला.
नेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला @cbawankule@Pankajamunde#MaharashtraPoliticshttps://t.co/gVBGx94Wmw
— Lokmat (@MiLOKMAT) December 13, 2019
दरम्यान, केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल असा सूचक इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपातील नाराज नेत्यांना दिला आहे. त्याचसोबत शरद पवार पावसात भिजले, त्यांच्या इडीच्या चौकशीनंतर वातावरण बदलले म्हणून राज्यातील सरकार बदलले याबद्दल बोलले जाते. पण आपण एकोप्याने वागलो नाहीत म्हणून आपलं सरकार आलं नाही असं चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
भाजपा खासदाराची पंकजा मुंडेंवर आगपाखड; पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? @BJP4Maharashtra@Pankajamunde#BJPhttps://t.co/jKnh7eRkE5
— Lokmat (@MiLOKMAT) December 13, 2019
नाथाभाऊंची वेदना समजू शकतो. त्यांनी दु:ख व्यक्त केलं, त्यात चूक नाही. आपल्या तक्रारी आणि व्यथांची पक्ष दखल घेईल, त्यावर उत्तर काढू, पण भविष्यात सगळं नीट झाल्यावर अपराधी किंवा संकोच वाटेल असे संवेदनशील शब्द वापरु नका, अशी दोघांना विनंती, त्याचे ओरखडे राहतात." पक्षाच्या चुका झाल्या नाहीत. चुका माणसांच्या झाल्यात. पक्षावर कशाला राग काढताय? असं गोपीनाथ गडावर चंद्रकांत पाटील म्हणाले होते.