बायपाससाठी ‘व्हेन’ वापरल्यास ‘ब्लॉक’ची शक्यता
By admin | Published: September 23, 2014 01:09 AM2014-09-23T01:09:29+5:302014-09-23T01:09:29+5:30
बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या
सौरभ वर्षने : लिमा-रिमा-व्हाय पद्धतीमुळे ब्लॉकचे प्रमाण कमी
नागपूर : बायपाससाठी हाताची किंवा पायाची ‘व्हेन’ (नाडी) वापरली असेल तर ती परत ब्लॉक होण्याचं प्रमाण ५० टक्के असते, परंतु ‘लीमा-रिमा-व्हाय’ या पद्धतीचा वापर केल्यास त्या ब्लॉक होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते, असे मत डॉ. सौरभ वर्षने यांनी व्यक्त केले.
रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. वरुण भार्गव, डॉ. अच्युत खांडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. वर्षने म्हणाले, डाव्या कोरोनरीचा मुख्य भाग म्हणजे मेनस्टेम ब्लॉक असेल तर बायपास सर्जरी हाच उपचार ठरतो. जेव्हा बलून अँजिओप्लास्टीने कोरोनरी ओपन करणं शक्य नसतं, अशा वेळी बायपास सर्जरी करावी लागते. यासाठी बहुसंख्य डॉक्टर रु ग्णांमध्ये पायातील ‘सॅफेनस व्हेन‘ किंवा हाताच्या मनगटाजवळची ‘रेडियल आर्टरी’ बायपाससाठी वापरतात. परंतु ही व्हेन परत ब्लॉक होण्याची शक्यता वाढते.
शिवाय रुग्णाच्या पायाची किंवा मनगटाजवळील व्हेन कापली जात असल्याने रुग्णाला काही आठवडे खाटांवर काढावे लागतात. परिणामी रुग्णालयाचा खर्चही वाढतो. परंतु बायपाससाठी स्टर्नमच्या दोन्ही बाजूच्या लिमा (लेफ्ट इन्टर्नल मॅमरी आर्टरी) आणि रिमा (राईट इन्टर्नल मॅमरी आर्टरी) या आर्टरी वापरल्यास भविष्यात ‘ब्लॉक’च्या प्रमाणाची टक्केवारी फार कमी होते. याला ‘लीमा-रिमा-व्हाय’ ही पद्धत म्हणतात.
पाश्चात्य देशात या शस्त्रक्रियेचे प्रमाण मोठे आहे. मागील पाच वर्षांपासून ही शस्त्रक्रिया डॉ. सुधांशु भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनात भारतात सुरू आहे. केअर इस्पितळात अशा पद्धतीच्या २५० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जास्त वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया लाभदायक ठरत आहे, असेही ते म्हणाले.(प्रतिनिधी)