"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 17:07 IST2025-03-16T17:06:33+5:302025-03-16T17:07:13+5:30
निकालाच्या दिवशी कोर्टात हजर न राहता पूजाने १० लाखांची मागणी विजयला केली.

"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य
अहिल्यानगर - घटस्फोट हवा असेल तर दहा लाख रूपये दे अन्यथा तुमचा काटा काढू अशी धमकी पत्नी आणि सासरच्या लोकांनी दिली. या धमकीनंतर एका तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणाची आई संगीता जोशी यांच्या तक्रारीवरून आश्वी पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीसह सासरा, सासू, मेव्हण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संगीता जोशी यांचा मुलगा विजय याचा विवाह मामा हरिभाऊ जोरी यांची मुलगी पूजाशी झाला होता. १९ जून २०२२ रोजी विजय आणि पूजा संगमनेर तालुक्यातील खांबे येथे विवाह बंधनात अडकले. ३ मे २०२४ रोजी पूजाचे वडील घरी येऊन आम्हाला काहीच न सांगता मुलीला घेऊन गेले. त्यानंतर पूजाने विजयला बोलावून घटस्फोटाची मागणी केली. सर्वांच्या संमतीने पूजाला अडीच लाख रूपये देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचे ठरले. ठरल्याप्रमाणे विजय आणि पूजा यांनी न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली.
सर्वकाही संमतीने होत असल्याने घटस्फोटाच्या निकालासाठी २७ फेब्रुवारी २०२५ ही तारीख कोर्टाने दिली. मात्र निकालाच्या दिवशी कोर्टात हजर न राहता पूजाने १० लाखांची मागणी विजयला केली. त्यानंतर पूजा आणि सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून विजयने टोकाचे पाऊल उचलले. विजयच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने पोलीस ठाणे गाठत याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सून पूजा, वडील हरिभाऊ जोरी, भाऊ प्रसाद जोरी यांच्याविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अलीकडेच मुंबईत काम करणाऱ्या एका तरूणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मानव शर्मा असं युवकाचं नाव होते. मानवचे लग्न ३० जानेवारी २०२४ रोजी निकितासोबत झालं होते. लग्नाच्या काही दिवसांनीच निकिता घरात वाद घालू लागली. त्यानंतर पतीला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देत होती. लग्नानंतरही तिचे आधीच्या प्रियकरासोबत संबंध होते. पतीने याला विरोध केला असता पत्नी निकिता आणि तिच्या घरच्यांनी मानवला धमकावले. त्यानंतर मानवने २४ फेब्रुवारीला गळफास घेतला. मृत्यूपूर्वी त्याने लाईव्ह व्हिडिओ काढून पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप केला होता.