महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा- राज्यपाल कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:49 AM2019-12-30T00:49:24+5:302019-12-30T06:42:23+5:30

सहकार हे बलस्थान तसेच भ्रष्टाचारामुळे ठरले वैगुण्य; राज्यपालांचे प्रतिपादन

If you want to do politics in Maharashtra, open a cooperative bank - Governor Koshari | महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा- राज्यपाल कोश्यारी

महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा- राज्यपाल कोश्यारी

Next

कल्याण : सहकार चळवळ ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असल्यास सहकारी बँक उघडा, असे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात बोलले जाते. मात्र, सहकार चळवळ हे जसे महाराष्ट्राचे बलस्थान आहे, त्याचप्रमाणे वैगुण्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी येथे केले.

कल्याण जनता सहकारी बँकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या संचालक सेवा पुरस्कार वितरण व बँकेचा वर्धापन दिन सोहळा के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी उपरोक्त विधान केले. राज्यपालांचे हे विधान विद्यमान सत्ताधारी पक्षांना कानपिचक्या असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी खासदार कपिल पाटील, बँकेचे अध्यक्ष सुरेश पटवर्धन, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, संचालक सेवा पुरस्कार न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उपाध्याय, बँकेचे उपाध्यक्ष मधुसूदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले की, मुंबईतील बड्या बँकांमध्ये झालेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे जनतेमधील विश्वास कमी होत चालला आहे. देशात प्रत्येक जागी भ्रष्टाचार होत आहे. अशा परिस्थितीत सहकार आणि सरकारपेक्षा जास्त महत्त्वाचे संस्कार आहेत. संस्कारी कामांतूनच जनतेत कमी झालेला विश्वास पुन्हा संपादन करणे शक्य होईल, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्यासाठी जनतेसमोर चांगल्या संस्कारी कामांचे उदाहरण ठेवावे लागेल. चांगल्या कामांसाठी सहकार्याची आवश्यकता आहे, याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर बँकेने सामाजिक बांधीलकीतून १० हजार झाडे लावली आहेत, अशी माहिती देण्यात आली असली तरी बँकेच्या भागधारकांची संख्या ५५ हजार आहे. त्यामुळे प्रत्येक भागधारकाने एक झाड लावल्यास ५५ हजार झाडे लावू शकता. ती जगविण्याची जबाबदारीही घेऊ शकता, असे आवाहन राज्यपालांनी बँकेला केले.

बँकेची उलाढाल पाच हजार कोटी रुपये आहे. येत्या काळात बँकेच्या उलाढालीचे लक्ष्य १० हजार कोटी रुपयांचे ठेवण्यात यावे. लक्ष्य मोठे ठेवल्यास ते गाठण्यासाठी सगळे काम करतात. बँकेचा नफा जास्त झाल्यावर बँकेकडून जास्त प्रमाणात लाभांशाची रक्कम सामाजिक कार्यावर खर्च केली जाईल. आता सध्या बँकेकडून दोन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या रकमेत वाढ करण्यात यावी, जेणेकरून समाजकार्यात बँकेचा अधिक हातभार लागेल, अशी सूचनाही राज्यपालांनी बँकेला केली.

पुरस्कारांचे वितरण
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते संचालक सेवा पुरस्काराने हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी व उद्योजक कृष्णलाल धवन यांना सन्मानित करण्यात आले. बँकेने पुरस्कार स्वरूपात उभयतांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, या दोन्ही सत्कारमूर्तींनी ही रक्कम पुन्हा संचालक सेवा पुरस्कार न्यासाच्या सामाजिक कार्यासाठी दिली.
संचालक सेवा पुरस्कार उद्योजक महेश अग्रवाल यांनाही देण्यात येणार होता. मात्र, त्यांच्या मातोश्रींचे अलीकडेच निधन झाल्याने ते पुरस्कार कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी त्याचा संदेश पाठविला होता. हा संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष पाटील यांनी केले.

Web Title: If you want to do politics in Maharashtra, open a cooperative bank - Governor Koshari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.